पाकिस्तानातील ग्वदर बंदराच्या विकासासाठी चीन अर्थपुरवठा करीत असून भविष्यात या बंदराचा वापर लष्करी वापरासाठी होऊ शकतो, असे संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टनी यांनी सांगितले.
ग्वदर बंदराबाबतच्या घडामोडींवर सरकारचे बारकाईने लक्ष असून या बंदराचा ताबा एका चिनी कंपनीला देण्यात येणार असल्याच्या वृत्ताबाबतही भारत दक्ष आहे. भविष्यात या बंदराचा लष्करी कारवायांसाठी वापर होऊ शकतो, असे अ‍ॅण्टनी यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले.
याबाबत भारताने यापूर्वीच चिंता व्यक्त केली असून चीन आता पाकिस्तानच्या विनंतीवरून या बंदराचे बांधकाम करीत आहे. ही चिंतेची बाब आहे असे सरळ आणि स्पष्ट आपले उत्तर असल्याचेही अ‍ॅण्टनी यांनी या वेळी सांगितले.
भारतीय सागरी क्षेत्रात चीनच्या कारवाया वाढल्या आहेत का, असे विचारले असता संरक्षणमंत्री म्हणाले की, बंदरांचा विकास, खोल समुद्रात खाणकाम, सागरी संशोधन आणि चाचेविरोधी कारवायांमध्ये चीन सहभागी होऊ लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China funding development of gwadar port in pakistan antony