चीनमधील कम्युनिस्ट पक्षाला शंभर वष्रे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने २०२१ मध्ये चीन मंगळावर शोधयान पाठवणार आहे. २०११ मध्ये चीनची मंगळ मोहीम फसली होती व त्यानंतर भारताची मंगळ मोहीम मात्र यशस्वी झाली आहे. भारत, अमेरिका, रशिया व युरोपीय समुदायाने मंगळ मोहिमात आघाडी घेतली आहे.
चीनच्या अवकाश कार्यक्रमाचे अधिकारी यी पेइजान यांनी सांगितले की, चीन २०२० पर्यंत मंगळावर यान पाठवण्याची तयारी पूर्ण करील, हे यान काही काळ मंगळाभोवती फिरल्यानंतर तेथे उतरणार आहे. चीन कम्युनिस्ट पक्षाची शंभर वष्रे त्यावेळी पूर्ण होत आहेत. २०२१ मध्ये हे यान मंगळावर पोहोचेल, त्यासाठी त्याला सात ते दहा महिन्यांचा प्रवास करावा लागणार आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा एकछत्री अंमल असून या पक्षाची स्थापना १९२१ मध्ये झाली होती. यी यांनी सांगितले की, चीनकडे चांद्र मोहिमेचा मोठा अनुभव आहे व २०१३ मध्ये चेंज ३ मोहिमेत अवकाशयान चंद्रावर पाठवण्यात यश आले होते. नोव्हेंबर २०१५ मध्ये चीनने मंगळावर पाठवण्यात येणाऱ्या आर्बटिर यानाची प्रतिकृती सादर केली. त्यात रोव्हर गाडीही उतरवण्यात येणार असून त्याचेही प्रारूप शांघायच्या चीन आंतरराष्ट्रीय उद्योग मेळ्यात मांडले होते. मंगळाचे अंतर ४०० दशलक्ष किलोमीटर असून तेथून संदेशांची देवाणघेवाण हे मोठे आव्हान आहे. चीनने २०११ मध्ये मंगळावर यान पाठण्याचा प्रयत्न केला पण ते फसले होते.
रशियाच्या मदतीने केलेला तो संयुक्त प्रयत्न होता. आतापर्यंत अमेरिका, माजी सोव्हिएत रशिया, युरोपीय अवकाश संस्था व भारत यांनी मंगळ मोहिमांत यश मिळवले आहे. चीनच्या अवकाश कार्यक्रमातील प्रमुख कंत्राटदार असलेल्या चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी या कंपनीने म्हटले आहे की, चीनच्या लाँग मार्च ५ अग्निबाणाचे कंत्राट आम्हाला मिळाले आहे, शिवाय इतर मोहिमेतील दहा कंत्राटे मिळाली आहेत. २०१७ मध्ये चीन चेंज ५ हे चांद्र शोधयान पाठवणार असून त्यातील कंत्राटांचा यात समावेश आहे.
चीन अवकाश स्थानकही पाठवणार असून ते २०२० पर्यंत मार्गस्थ होण्याची अपेक्षा आहे. नवीन अग्निबाणाचे उड्डाण यावर्षी होणार आहे. मंगळयानाची रचना चेंज ३ यानासारखीच असून त्यात अनेक बदल केले आहेत. चेंज ३ यान २०१३ मध्ये मंगळावर पाठवले पण ते अपयशी ठरले होते. मंगळ मोहिमेत अनेक आव्हाने आहेत पण त्यावर मात करता येईल असे त्यांनी सांगितले.
