रॉयटर्स, काबूल : ‘‘अफगाणिस्तानमधील खनिजे शोधणे आणि त्यांच्या उत्खननामध्ये चीनला रस असून, अफगाणिस्तानने चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’मध्ये (बीआरआय) सहभागी व्हावे, असे आवाहन चीनने मंगळवारी केले,’’ अशी माहिती अफगाणिस्तानमधील तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, की चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग यी यांनी अफगाणिस्तानला भेट दिली आणि परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी यांची भेट घेतली. दोन्ही देश विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यास उत्सुक आहेत. चीन या वर्षी प्रत्यक्ष खाणकामास सुरुवात करण्यास इच्छुक असल्याचे वाँग यी यांनी सांगितले.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर त्या देशात राजदूत नियुक्त करणारा चीन हा पहिला देश आहे. अमेरिका माघारी गेल्यानंतर अफगाणिस्तानबरोबर संबंध अधिक दृढ करण्यास चीनने प्राधान्य दिले आहे. अफगाणिस्तानमध्ये लिथियम, तांबे, लोखंडाचे साठे आहेत. अफगाणिस्तानमधील खनिज उत्खनन करण्याची संधी चीनला मिळाली, तर चीनची पुरवठा साखळी अधिक मजबूत होणार आहे.

‘सीपेक’च्या दुसऱ्या टप्प्याचे महिनाअखेर उद्घाटन

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ या महिनाअखेरील चीनला भेट देणार असून, या भेटीमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग (सीपेक) या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे अनावरण होणार आहे. नियोजनमंत्री एहसान इक्बाल यांनी मंगळवारी उच्च स्तरावर झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली. पाकव्याप्त काश्मीरमधून ‘सीपेक’ जात असल्याने भारताचा त्यावर आक्षेप आहे.