CJI Gavai reacts on his remark on Khajuraho Vishnu Idol Case Social Media Row : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्य प्रदेशातील खजुराहो येथे असलेल्या जवारी मंदिरातील भग्नावस्थेतील सात फूट उंच भगवान विष्णूच्याय मूर्तीबद्दल केलेल्या विधानानंतर वाद पेटल्याचे पाहायला मिळाले होते. अखेर गुरूवारी सरन्यायाधीश गवई यांनी त्यांच्या विधानाबद्दल त्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी आपण सर्व धर्मांचा आदर करतो असे म्हटले आहे.

सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, त्यांनी केलेले विधान हे मंदिर हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाच्या अखत्यारीत असल्याशी संबंधीत होते. “कोणीतरी मला सांगितले की मी त्या दिवशी केलेले विधान सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली… मी सर्व धर्मांचा आदर करतो,” असे सरन्यायाधीश म्हणाल्याचे वृत्त लाईव्ह लॉने दिले आहे.

नेमका विषय काय आहे?

मध्य प्रदेशातील खजुराहो येथे असलेल्या जवारी मंदिरातील भग्नावस्थेतील सात फूट उंच भगवान विष्णूची मूर्ती पुनर्निर्मित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरन्यायाधीशांनी ही याचिका फेटाळून लावताना केलेले विधानामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली. या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीशांनी आधीच ही याचिका एक ‘प्रसिद्धी याचिका’ असल्याचे सांगितले होते. यानंतर आता सरन्यायाधीशांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

गवई नेमकं काय म्हणाले होते?

या प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश म्हणाले, “जर तुम्ही खरे विष्णूभक्त असाल तर प्रार्थना करा, ध्यानधारणा करा. देवाला स्वतःलाच विचारा की काही करावे.” याचिकाकर्त्याच्या वकिलांनी मूर्तीचे छायाचित्र दाखवत सांगितले की, मूर्तीचे शिर तुटलेले आहे व त्याची पुनर्निर्मिती करणे आवश्यक आहे. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की खजुराहोतील मंदिरे ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाच्या अखत्यारीत आहेत. “ही एक पुरातत्त्वीय धरोहर आहे. अशा पद्धतीने मूर्ती बदलणे किंवा नवी बसवणे हे एएसआयच्या नियमांनुसार मान्य होईल का, हा स्वतंत्र विषय आहे,” असे खंडपीठाने नमूद केले.

पुढे न्या. गवई म्हणाले, “दरम्यान, जर तुम्हाला शैव परंपरेविरुद्ध काही हरकत नसेल, तर तेथे भगवान शंकराचे एक विशाल शिवलिंग आहे. त्याची पूजा करा.” शेवटी खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.

पण वाद पेटला…

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद पेटला. अनेक हिंदू संघटनांनी त्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवली गेल्याचे म्हटले. इतकेच नाहीतर या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखवल्याचा मुद्दा अनेकांनी उपस्थित आणि यातच गवई यांच्यावर महाभियोग चालवला जावा अशी मागणी करणाऱ्या पोस्ट देखील व्हायरल झाल्या.

विश्व हिंदू परिषदेचे (VHP) प्रमुख आलोक कुमार यांनी ‘विशेषतः न्यायालयात बोलताना संयम राखण्याचे आवाहन केले. तर अनेक भक्तांनी देखील सरन्यायाधीशांकडे यांच्याकडे त्यांचे भगवान विष्णू आणि सनातन धर्माविरोधातील विधान मागे घेण्याची मागणी केली.