Class 10 student stabbed outside Ahmedabad school : अहमदाबाद येथे एका दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या गेटच्या बाहेर चाकूने हल्ला करण्यात आला होता. यानंतर मंगळवारी जखमी झालेल्या या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. य़ानंतर बुधवारी सकाळी या शाळेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या १०वीच्या विद्यार्थ्यावर त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या एका ८वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने चाकूने हल्ला केला होता.

मृत्यू झालेला विद्यार्थी आणि आरोपी हे वेगवेगळ्या समाजातील होते आणि या शाळेबाहेरील आंदोलनात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलही सहभागी झाल्याने हे आंदोलन चांगलेच पेटले. यावेळी शिक्षक आणि शाळेचे प्राचार्य यांना देखील मारहाण करण्यात आली, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात येण्यापूर्वी जमावाने शाळेच्या मालमत्तेचेही नुकसान केले. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी विनंती केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

जेसीपी (गुन्हे) शरद सिंघल यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी करावी अशी आंदोलकांची मागणी होती आणि आयुक्तांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सूपूर्द केले आहे.”

यापूर्वी जेसीपी सिंघल म्हणाले होते की, आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासात आहोत आणि घटनास्थळाची देखील तपासणी केली जात आहे जेणेकरून तेथील पुरावे नस्ट केले गेले आहेत का हे तपासता येईल. तसेच प्रमुख आरोपी अल्पवयीन मुलाला काल ताब्यात घेण्यात आले आहे, दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाची या प्रकरणी चौकशी केली जात आहे.

मंगळवारी दुपारी १२.३० वाजता ही ङटना घडली जेव्हा १५ वर्षीय पीडित हा शाळेच्या गेटमधून बाहेर आला. १६ वर्षीय आरोपी त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या पोटात चाकूने वार केले. त्यानंतर पीडित मुलाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण बुधवारी पहाटे ३ वाजता त्याचा मृत्यू झाला. आठवड्यापूर्वी या दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता, त्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

बुधवारी दुपरी २ वाजता कुटुंबाने पीडित मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शाळेच्या गेटबाहेर ठेवून दिला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी (शहर) यांनी शाळा प्रशासनाला नोटीस बजावली असून स्पष्टीकरण मागितले आहे.