Colombian presidential candidate Miguel Uribe shot : कोलंबियाचे सिनेटर मिगुएल उरिबे यांच्यावर शनिवारी बोगोटा येथे एका प्रचार सभेदरम्यान गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आहे. उरिबे हे २०२६ ची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दरम्यान उरिबे यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्या ३९ वर्षीय उरिबे यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.

उरिबे हे कोलंबियाचे माजी अध्यक्ष अल्वारो उरिबे यांनी स्थापन केलेल्या विरोधी कंझर्व्हेटिव्ह डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाचे सदस्य आहे. रक्ताने माखलेल्या उरिबे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला जखम झालेली दिसून येत आहे.

फोन्टिबोन जिल्ह्यात त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर उरिबे यांना आपत्कालीन आरोग्य सेवा दिली जात आहे अशी माहिती बगोटाचे मेयर कार्लोस गॅलन यांनी दिली. जर त्यांना दुसरीकडे हलवाण्याची गरज भासली तर त्यासाठी संपूर्ण हॉस्पीटल नेटवर्क अलर्टवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी हल्लेखोराला अटक करण्यात आल्याचे देखील यावेळी स्पष्ट केले.

कोलंबियन सरकारने या हल्ल्याचा निषेध करत एक निवेदन जारी केले आहे, तर कोलंबियन अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी एक्सवर पोस्ट करत सेनेटर उरिबे यांच्या कुटुंबियांप्रती सद्भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, “तुमच्या वेदना कशा कमी कराव्या मला माहिती नाही. हे एका हरवलेल्या आईचे आणि जखमी मातृभूमीचे दुःख आहे.”

उरिबे यांच्या डेमोक्रॅटीक सेंटर पार्टीनुसार, शनिवारी बोगोटामधील फोन्टिबोन भागात सिनेटर उरिबे हे एक प्रचारसभेत बोलत होते तेव्हा एका शस्त्रधारी व्यक्तीने त्यांना मागून गोळ्या घातली. पक्षाने उरिबे यांच्यावर झालेला हल्ला हा गंभीर असल्याचे म्हटले आहे, मात्र त्यांच्याकडून उरिबे यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली नाही.

कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी सांगितले की त्यांनी सिनेटर उरिबे यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाला भेट दिली आहे. सांचेझ यांनी माहिती दिली की पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे आणि इतरांचा सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे.