वृत्तसंस्था, फ्रँकफर्ट
‘क्राऊडस्ट्राइक’ कंपनीच्या ‘फाल्कन सेन्सर’ सॉफ्टवेअरच्या अपडेटमध्ये झालेल्या गोंधळानंतर शुक्रवारी जगभरात गोंधळ उडाला. असंख्य उड्डाणे रद्द झाली तर, प्रवाशांच्या रांगा आवरणे विमानतळ व्यवस्थापनांना कठीण गेले, बँकिंग कामकाज कोलमडल्यामुळे असंख्य व्यवहार अडकले तर, रुग्णांची नोंद तपासता न आल्याने रुग्णालयीन सेवा विस्कळीत झाल्या.
अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील अनेक विमानतळांवर ‘चेक इन’साठी प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, संगणकांवर ‘ब्लू स्क्रीन’च्या पलिकडे काहीही दिसत नसल्याने विमान कंपन्याही हतबल झाल्या. भारतात अनेक ठिकाणी विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी तिकिटांवर लेखी स्वरूपात आसनक्रमांक देण्यास सुरुवात केली. ब्रिटनमधील लंडन शेअर बाजार आणि राष्ट्रीय आरोग्य सेवेलाही या बिघाडाचा फटका बसला. रुग्णांच्या पूर्वनोंदी सापडत नसल्याने ब्रिटनमधील अनेक शस्त्रक्रिया शुक्रवारी लांबणीवर टाकाव्या लागल्या. रेल्वेच्या काही सेवाही रद्द कराव्या लागल्या. ब्रिटनमधील सर्वच ईकॉमर्स सेवा शुक्रवारी रडतरखडत सुरू होत्या. ब्रिटनमधील वृत्तवाहिन्याही काही तास बंद ठेवाव्या लागल्या. ऑस्ट्रेलियामध्येही ‘एबीसी’ व ‘स्काय न्यूज’ या वाहिन्यांचे प्रसारण बंद राहिले.