काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद हे पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग आणि पॅलेस्टिनी अतिरेकी हमास हे एकसारखेच असल्याचे इम्रान मसूद एका पॉडकास्टमध्ये बोलत असताना म्हणाले. दोघेही आपल्या मायभूमीसाठी लढत आहेत, असे सांगून त्यांनी आपल्या विधानाचे समर्थनही केले. यानंतर आता भाजपाकडून मसूद यांच्यासह काँग्रेसवर टीका केली जात आहे.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमास या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. या हल्ल्यात जवळपास दीड हजार इस्रायली नागरिक मारले गेले. तर २५० हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवले गेले. या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष धुमसत आहे. दोन वर्षांनंतर काही दिवसांपूर्वी शांतता करार झाल्यानंतर हा संघर्ष थांबलेला नाही.

पत्रकार सुशांत सिन्हा यांना दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये इम्रान मसूद यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर बोलत असताना सदर विधान केले. ते म्हणाले, “भारताला परराष्ट्र धोरणच नाही. पॅलेस्टाईनवर इस्रायलने हल्ला केला, त्याचा आपण निषेध व्यक्त केला नाही.” हमास ही एक दहशतवादी संघटना आहे, असे पत्रकार सुशांत सिन्हा यांनी सांगताच इम्रान मसूद म्हणाले की, भगतसिंग दहशतवादी होते का? यानंतर मसूद यांना विचारले गेले की, तुम्ही हमास आणि भगतसिंग यांची तुलना करत आहात का? या प्रश्नावरही त्यांनी ‘हो’ असे उत्तर दिले.

इम्रान मसूद म्हणाले, “भगतसिंग आपल्या मायभूमीसाठी लढले होते, त्याचप्रमाणे हमासही त्यांच्या मायभूमीसाठी लढत आहे. हमासने आपल्या स्वातंत्र्याचा लढा उभारला आहे. त्यांनी जो मार्ग निवडला आहे, त्यावरून वाईट वाटते.”

हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर अनेकांना मारले. शेकडोंना ओलीस ठेवले. पॅलेस्टीनी नागरिकांची ढाल बनवून ते लढत आहेत, ते दहशतवादी नाहीत का? असाही प्रश्न इम्रान मसूद यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना इम्रान मसूद म्हणाले की, हमासने काही शेकडो लोकांना मारले. पण त्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने लाखाच्या आसपास लोकांना मारले. हे का पाहिले जात नाही?

मुलाखतकाराने इम्रान मसूद यांना महात्मा गांधींबद्दल प्रश्न विचारला. महात्मा गांधींनीही मायभूमीसाठी लढा उभारला होता. लढा उभारण्याची एक पद्धत असते, पण हिंसा करून स्वातंत्र्य प्राप्त केले जाते का? असा प्रश्न विचारला. यानंतर इम्रान मसूद यांनी सावध पवित्रा घेतला आणि आम्ही अहिंसावादी लोक असल्याचे सांगितले.

भाजपाची टीका

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी या मुलाखतीमधील संबंधित विधानाचा एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. ज्यात त्यांनी इम्रान मसूद यांच्यासह काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, “डावे आणि काँग्रेसचे नेते दहशतवाद्यांचे समर्थन करतात. यापूर्वी कन्हैया कुमारने भगतसिंग यांची तुलना लालू यादव यांच्याशी केली होती. यापूर्वी काँग्रेसने इतरही महापुरूषांचा असाच अवमान केला होता.”