कॉंग्रेसने वढेरा स्कूल ऑफ बिझनेस सुरू करावे, असा घणाघाती हल्ला मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे खासदार यशवंत सिन्हा यांनी केला. यशवंत सिन्हा यांनी वढेरा यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहारांचा मुद्दा मंगळवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केल्यावर सत्ताधारी कॉंग्रेसच्या सदस्यांनी प्रचंड गोंधळ घालण्यास सुरुवात केली. संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ हे देखील सभागृहातच य़शवंत सिन्हा यांच्याविरोधात बोलू लागले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
कामकाज तहकूब झाल्यावर संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना यशवंत सिन्हा म्हणाले, रॉबर्ट वढेरा यांनी दिल्लीलगतच्या परिसरात कवडीमोल किंमतीत जमिनी विकत घेऊन त्या अल्पकालावधीत मोठ मोठ्या किंमतीत विकण्याचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी एक नवे बिझनेस मॉडेल तयार केलेय. कॉंग्रेसने आता वढेरा स्कूल ऑफ बिझनेस सुरू करावे आणि त्यामध्ये सर्वांत आधी देशाचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना प्रवेश द्यावा.
वढेरा यांच्याविरोधात काहीही ऐकायची कॉंग्रेसची तयारी नाही. आम्हाला संसदेचे कामकाज गंभीरपणे चालावे, असे वाटते. मात्र, कॉंग्रेसचेच सदस्य सातत्याने सभागृहाचे कामकाज गोंधळ घालून रोखत आहेत, असाही आरोप यशवंत सिन्हा यांनी केला.