कफ सिरपच्या दुष्परिणामाने मृत्यू होणाऱ्या मुलांची संख्या वाढतच आहे. या प्रकरणातील बळींची संख्या २२ वर पोहोचली आहे. बुधवारी रात्री आणखी एका तीन वर्षीय मुलाचा नागपुरात मृत्यू झाला. या प्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणी कोल्ड्रीफ या औषधाची निर्मिती करणाऱ्या श्रेसन फार्मा कंंपनीचा मालक रंगनाथन गोविंदन याला चेन्नई येथून अटक केली. तत्पूर्वी कंपनीचा कारखानाही सील करण्यात आला. तसेच कांचीपूरम येथील कारखान्यातून कागदपत्रे जप्त करण्यात आली.

यापूर्वी मध्य प्रदेश सरकारने दोन औषध निरीक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाच्या उपसंचालकांना निलंबित केले होते. तसेच पोलिसांनी हे औषध मुलांसाठी लिहून देणाऱ्या डॉ. प्रवीण सोनी यालाही छिंदवाडा येथे अटक केली होती. त्याचा जामीन अर्ज परासिया येथील न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे गुरुवारी दुपारी नागपुरात पोहोचले. विमानतळावरून ते थेट एम्समध्ये गेले. येथे छिंदवाडा जिल्ह्यातील दोन मुले दाखल आहेत. हेल्थ सिटी रुग्णालय व मेडिकल रुग्णालयालाही ते भेट देणार आहेत.

औषधांची निर्यात नाही

देशातील औषध नियंत्रण करणाऱ्या ‘सीडीएससीओ’ने कोल्ड्रीफ, रेस्पिफ्रेश टीआर आणि रीलाइफ या तीन खोकल्याच्या औषधांचा साठा भारतीय बाजारातून परत मागवण्यात आला असून त्याचे उत्पादनही थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. यापैकी कोणतेही औषध निर्यात करण्यात आलेले नाही, असेही त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला कळवले आहे.