साऊदम्पटन : सुरक्षित झेल पडकण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ विशेष ओळखला जातो. परंतु विश्वचषकाच्या दृष्टीने क्षेत्ररक्षणात सुधारणेच्या उद्देशाने क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधरन यांनी वर्तुळाकार चेंडूफेकीचा सराव घेतला.

रोमहर्षक सामन्यात धावचीत करण्यासाठी यष्टीवर थेट चेंडू फेकणे अतिशय महत्त्वाचे असते. भारतीय संघासाठी हे सरावसत्र योजले होते. वर्तुळातील सहा विविध क्षेत्ररक्षणांच्या स्थानांवरून खेळाडूला गोलंदाजाच्या बाजूच्या यष्टीकडे २० वेळा चेंडू फेकण्याचे आव्हान देण्यात आले होते. खेळाडूंनी या सत्राचा मनसोक्त आनंद लुटला. या सत्रात श्रीधरन यांनी चेंडू फेकण्याची शास्त्रशुद्ध पद्धती खेळाडूंना दाखवली.

याशिवाय भारताचा कर्णधार विराट कोहलीने नेटमध्ये ऑफ-ब्रेक गोलंदाजीचा सराव केला. परंतु फलंदाजांना ती खेळण्यात कोणतीही अडचण वाटत नव्हती. केदार जाधव खेळू न शकल्यास पर्यायी गोलंदाज म्हणून विराट उपयुक्त ठरू शकतो.