‘मैदानामध्ये क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी कसे वागावे हे सांगण्याचा कोहलीला अधिकार नाही’ अशा शब्दांमध्ये ब्रिटिश क्रिकेटपटूने भारताचा कर्णधार विराट कोहलीवर टिका केली आहे. वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडववणाऱ्या प्रेक्षकांना कोहलीने खडसावले होते. त्याचसंदर्भात नीक कॉम्पटन याने कोहलीला लक्ष्य केलं आहे.

भारताने दिमाखदार विजय मिळवला असला तरी कर्णधार विराट कोहलीच्या एका कृतीने सर्वांचीच मनं जिकली. सामना सुरु असताना भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीने आवडला नाही आणि त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले. इतकंच नव्हे या प्रकारासाठी कोहलीने प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफी देखील मागितली. या कृतीसाठी जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी कोहलीचे कौतूक केले मात्र कोहलीचे वागणे शिष्ट होते अशी टिका कॉम्पटनने केली आहे.

इंग्लंडमधील प्रथामिक स्तरावरील क्रिकेटपटू असणाऱ्या नीकला कोहली आवडत नाही. कोहलीच्या प्रत्येक कृतीवर तो टिका करताना दिसतो. अशीच टिका त्याने ओव्हलमधील एका घटनेवरुन केली आहे. विराटने सामन्यादरम्यान दाखवलेल्या खिळाडूवृत्तीवर टिका करताना, ‘क्रिकेट चाहत्यांनी कसे वागावे आणि कसे नाही हे सांगण्याचा कोहलीला अधिकार नाही’ असं नीक म्हणाला आहे. ‘वॉर्नर आणि स्मिथची हुर्यो उडवणाऱ्या प्रेक्षकांना थांबवण्याचा हक्क कोहलीला नाही असं मला वाटतं. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा उस्फूर्त होता त्यावर कोहलीने शिष्टाई करण्याची गरज नव्हती. क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पैसे मोजलेले असतात. मैदानात कसं वागावं हा त्यांचा प्रश्न असतो,’ असं नीक म्हणाला आहे.

मात्र अनेकांनी टिका केल्यानंतर नीकने मी विराटबद्दल केलेल्या वक्तव्य चुकीचे वाटले असल्यास मी माफी मागतो असे ट्विट केले आहे.

नीक याने आपले मत व्यक्त केले असले तरी त्याच्या ट्विटखाली अनेकांनी त्याच्या या भूमिकेवर टिका केली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धचा समाना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत मैदानात घडलेल्या या प्रकाराबद्दल बोलताना कोहली म्हणाला, ‘वॉर्नर आणि स्मिथसंदर्भात जे घडलंय त्याला खूप कालावधी झाला आहे. आता स्मिथ मैदानात परतला आहे. एखाद्याचे असे खच्चीकरण करणे योग्य नाही. एखाद्या खेळाडूला मैदानात उतरल्यावर वारंवार अशा घटनांचा सामना करावा लागणं चुकीचेच आहे.’