मालकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता त्याला प्रतिकार करणाऱ्या एका दलित महिलेला त्या मालकानेच जिवंत जाळल्याची घटना येथील किरा गावात घडली आहे. या प्रकारात सदर महिला ९५ टक्के भाजली असून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर दलित महिला येथील एका वीटभट्टीत काम करीत होती. भट्टीचा मालक आस मोहम्मद याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याला जोरदार प्रतिकार केला. यामुळे संतप्त झालेल्या आस मोहम्मद आणि अन्य एका व्यक्तीने तिच्यावर केरोसीन ओतून तिला पेटविले, असे पोलिसांनी सांगितले.
मात्र या महिलेची जबानी घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या उपनिरीक्षकाने, सदर महिला वीटभट्टीवर काम करताना भाजल्याचा अहवाल दिला आहे. मात्र मालकाने तिला जाळण्याचा प्रयत्न केला असे तहसीलदाराने सांगितल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपनिरीक्षक छोटेसिंग याला निलंबित केले आहे.
या प्रकरणी आरोपी मोहम्मद याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी पोलीस कारागृहात करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.