दिल्लीत प्रदुषणाच्या वाढलेल्या पातळीमुळे नवी दिल्लीतील खासगी शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर दिल्ली पालिकेच्या शाळांनाही शनिवारी सुट्टी देण्यात आली. दिवाळीच्या काळात दिल्लीतील प्रदुषणाची पातळी कमालीची वाढली असल्याने दिल्ली, नोएडा, गुडगाव भागातील तब्बल १८०० शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. बहुतांश शाळांनी शुक्रवारी आणि शनिवारी सुट्टी जाहीर केली होती. याशिवाय, विद्यार्थ्यांना प्रदुषणयुक्त हवेचा सामना करावा लागू नये म्हणून अनेक शाळांनी सहली आणि मैदानी खेळाचे तास रद्द केले आहेत. दरम्यान, दिल्ली सरकारकडून दिल्ली प्रदुषण नियंत्रण समितीला (डीपीसीसी) प्रदुषण कमी करण्यासाठी उपाययोजना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, सरकारकडून यासाठी तज्ज्ञांच्या विशेष समितीचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
दिवाळी आणि वाहनांच्या प्रदूषणानंतर दिल्ली काळ्या धुक्याच्या चादरीखाली गडप झाली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना यामुळे श्वास घेणेही अवघड झाले आहे. दिल्लीच्या इतिहासातील हे १७ वर्षातील सर्वात धोकादायक धुके आहे. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.
दिल्लीतील यूएस दुतावास परिसरातील पीएम २.५ चे प्रमाण ९९९ पर क्यूबिक मीटर होते. तर आनंद विहारमध्ये हेच प्रमाण ७०२ पर क्यूबिक मीटर होते. मुंबईत पीएम २.५ चे प्रमाण ४९४, पुण्यात हेच प्रमाण ४०० पर क्यूबिक मीटर ऐवढे होते. शिवाजीनगर परिसरात पीएम १० चे प्रमाण २६८ ऐवढे होते. दिल्लीपाठोपाठ अहमदाबादमध्ये वायू प्रदुषणाने वायू प्रदुषणाची पातळी ओलांडली होती. अहमदाबादमध्ये पीएम २.५ चे प्रमाण ९९९ ऐवढे होते. हे प्रमाण मर्यादेपेक्षा १५ पट जास्त असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे. हवेच्या प्रतवारीचे (एअर क्वालिटी इंडेक्स) प्रमाण जास्तीत जास्तीत ३३४ असणे अपेक्षित होते.