भारतीय वायुदलाने मंगळवारी पहाटे एअर स्ट्राईक करून पुलवामा येथील हल्ल्याचा बदला घेतला. या हल्ल्यात 200 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचा दावा कऱण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 72 तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत असं सांगण्यात आलं आहे. ज्यानंतर हा हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून आलेली धमकी हेच यामागचं कारण नाही तर काश्मीर खोऱ्यात इतर काही दहशतवादी आहेत जे कोणत्याही हल्ल्यासाठी सज्ज असू शकतात. त्या पार्श्वभूमीवर हा हाय अलर्ट देण्यात आला आहे.

पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधील तीन शहरांनाही हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सैन्य दलाचे तळ, शस्त्रे यांवर विशेष नजर ठेवली जाते आहे. दहशतवाद विरोधी कारवाईसाठी सज्ज असलेली पथकंही शहरांमध्ये तैनात करण्यात आली आहेत अशीही माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते सुरक्षेबाबत काय तयारी झाली आहे, समजा एखादा हल्ला झाला तर काय करता येईल यासंदर्भातली चर्चा होणार आहे.

मात्र दहशतवाद्यांनी काही केले तर त्याला सामोरे कसे जायचे याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. 14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामा भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात भारतीय लष्कराचे चाळीस जवान शहीद झाले. याच हल्ल्याचा बदला भारताने एअर स्ट्राइक करून घेतला. मात्र त्यानंतर भारताने पाच शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारताने पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा देशाच्या नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकार घडू नयेत म्हणून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.