दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आम आदमी पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु असून, यात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाचाही समावेश आहे. ‘आप’च्या नेत्यांनी रघुराम राजन यांच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त असून आता रघुराम राजन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ एकतर्फी विजय मिळवला होता. ७० पैकी ६६ जागांवर आपचे आमदार आहेत. त्यामुळे जानेवारी २०१८ मध्ये दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागा आपच्या वाट्याला येणार आहेत. या तीन जागांसाठी पक्षातील नेत्यांऐवजी बाहेरच्या मंडळींना उमेदवारी देण्याचा ‘आप’चा प्रयत्न आहे. शिक्षण, अर्थ अशा विविध क्षेत्रांमधील दिग्गजांना उमेदवारी देण्याचा आपचा इरादा आहे.
राज्यसभेतील तीन पैकी एका जागेसाठी रघुराम राजन यांना उमेदवारी देण्यासाठी आपचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांनी रघुराम राजन यांच्याशी संपर्क साधला आहे. चर्चा सुरु असली तरी याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असे वृत्तात म्हटले आहे. चर्चा सध्या प्राथमिक स्तरावरच आहे, असेही आपमधील सूत्रांनी स्पष्ट केले.
बाहेरुन उमेदवार आयात केल्यास पक्षात नाराजी पसरण्याची चिन्हे आहेत. आपमधील वरिष्ठ नेते कुमार विश्वास हेदेखील राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. ओखलामधील आमदार अमानतुल्ला खान यांच्याशी वाद झाल्यानंतरही कुमार विश्वास यांनी पक्ष सोडला नव्हता. राज्यसभेचे आश्वासन मिळाल्याने कुमार विश्वास यांनी पक्ष सोडला नव्हता, अशी चर्चा होती. कुमार विश्वास यांना राज्यसभेची उमेदवारी मिळू नये, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आपला सोडचिठ्ठी देणारे कपिल मिश्रा यांनी केला होता. त्यामुळे दिग्गजांना उमेदवारी दिल्यास पक्षात नाराजी पसरण्याची चिन्हे आहेत.