नवी दिल्लीतील शालीमार बाग परिसरात असलेल्या मॅक्स रूग्णालयाचा परवाना अखेर रद्द करण्यात आला आहे. एक आठवड्यापूर्वी या रूग्णालयाने दोन नवजात जुळ्या बालकांना मृत घोषित केले. एवढेच नाही तर या दोन्ही मुलांचे मृतदेह पॉलिथीनच्या पिशवीत गुंडाळून सीलबंद केले आणि त्यांच्या पालकांना अंत्यसंस्कारासाठी सोपवले. या मुलांचे पालक आणि इतर नातेवाईक अंत्यसंस्कारांसाठी जात असताना पॉलिथीनच्या पिशवीत हालचाल जाणवली तेव्हा दोनपैकी एक मूल जिवंत असल्याचे समजले. या पालकांनी तातडीने पिशवी उघडली तेव्हा जुळ्या दोन मुलांपैकी एक मूल जिवंत होते. त्या मुलाला तातडीने दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही दिवसांनी ते मूलही दगावले. या सगळ्या प्रकारात दिल्लीच्या मॅक्स रूग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी एक पत्रकार परिषद घेऊन रूग्णालयाचा परवानाच रद्द केल्याचे सांगितले. ‘एएनआयने’ या संदर्भातले वृत्त दिले आहे.

दिल्लीतील शालीमार बाग भागात मॅक्स रूग्णालय आहे. या रूग्णालयात सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या एका बाईने मागील आठवड्यात दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. यापैकी एक मूल तातडीने दगावले. तर दुसरे मूल काही वेळाने दगावले असे मॅक्स रूग्णालयाने या मुलांच्या आई वडिलांना सांगितले. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हे कुटुंब मुलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जात असताना एका बाळाने हालचाल केली. यामुळेच रूग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला. या रूग्णालयाने मोठ्या प्रमाणावर पैसे मागितल्याचा आरोपही मुलांचे वडील आशिष यांनी केला.

या सगळ्या प्रकरणाची आठवडाभर सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत मॅक्स रूग्णालय दोषी आढळले. ज्यामुळे या रूग्णालयाचा परवानाच रद्द करण्यात आला आहे. जुळी मुले दगावल्याप्रकरणी रूग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या रूग्णालयाने मुलांचे जीव वाचावेत म्हणून ५० लाख रूपये मागितले असाही आरोप पालकांनी केला आहे.