स्वाइन फ्लू देशामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त पसरला आहे आणि त्याच्यावर करण्यात येणारे लसीकरण याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचा पुनर्आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. त्यानुसार कोणत्या भागात तात्काळ लसीकरण करणे आवश्यक आहे याचा पुनर्आढावा घेण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशामध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ होत असून, आतापर्यंत यामध्ये शेकडो जणांचा बळी गेला आहे. स्वाइन फ्लूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी आता लसीची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढ वाढली आहे. ज्या ठिकाणी स्वाइन फ्लूची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी आवश्यक त्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे, आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोग्य सेवेचे महासंचालक जगदीश प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समिती देशातील स्वाइन फ्लूच्या स्थितीवर लक्ष ठेवेल. सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, लसीकरणाची शिफारस गर्भवती महिला, अतिशय जास्त आजारी असलेले रुग्ण, हृदय रुग्ण, मधुमेह, कर्करोग असलेल्या रुग्णांसाठी करण्यात आली आहे. त्यांच्यामध्ये इतर सामान्य व्यक्तींच्या तुलनेत रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमी असते. याच्यासह आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, ६५ वर्षांवरील वृद्ध, सहा महिने ते आठ वर्षांदरम्यानचे मुले यांच्यासाठीही लसीकरणासाठी प्राथमिकता देण्यात आली आहे. या सर्वाना लसीकरण करण्यासाठी अधिक मोठय़ा प्रमाणात लसीची आवश्यकता असून, त्यामुळे बाजारात याची मोठय़ा प्रमाणात मागणी वाढू शकते, असे काही राज्यांनी म्हटले आहे.

यासह याबाबतच्या इतर समस्यांवर मार्ग काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती ज्या भागामध्ये अधिक प्रमाणात लसीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी लसीचा आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा करेल.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चालू वर्षांमध्ये स्वाइन फ्लूमध्ये जवळपास १ हजार ५८६ लोकांचा बळी गेला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण ६ टक्क्यांनी जास्त आहे. १० सप्टेंबपर्यंत स्वाइन फ्लूची लागण ३१ हजार ७८७ जणांना झाली आहे. महाराष्ट्रामध्ये स्वाइन फ्लूचे सर्वाधिक बळी गेले असून, ५३२ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये ३९६, राजस्थान १४१ आणि उत्तर प्रदेशमध्ये ८० लोक स्वाइन फ्लूमुळे दगावले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for swine flu vaccine rises