वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतीय मालावर ५० टक्के आयातशुल्क लादून भारताला अन्यायकारकपणे लक्ष्य करत असल्याची टीका डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. यापैकी २५ टक्के आयातशुल्क हे रशियाकडून तेलखरेदी केल्याबद्दल लादल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. ट्रम्प यांनी ६ ऑगस्टला या शुल्कांची घोषणा केली आणि ते बुधवार, २७ ऑगस्टपासून लागू झाले.
या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणसंबंधी समितीवरील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी, ट्रम्प यांच्या आयातशुल्क धोरणामुळे अमेरिका-भारत संबंध बिघडत असल्याचा इशारा दिला. रशियाकडून सर्वाधिक तेलखरेदी करणाऱ्या चीनवर अमेरिकेने कोणतेही दंडात्मक आयातशुल्क लादलेले नाही याकडे या सदस्यांनी लक्ष वेधले आणि ट्रम्प यांच्या निर्णयाचा युक्रेन युद्धाशी काहीही संबंध नाही असे नमूद केले.
युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी रशियावर दबाव टाकण्याचा भाग म्हणून भारतावर अतिरिक्त आयातशुल्क लादल्याचा दावा अमेरिकेच्या प्रशासनाने केला आहे, मात्र तो चुकीचा असल्याची टीका डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी केली आहे. परराष्ट्र धोरणासंबंधी समितीवरील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी ‘एक्स’वर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “चीन किंवा रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या अन्य देशांवर निर्बंध लादण्याऐवजी, ट्रम्प यांनी भारताला लक्ष्य केले आहे. यामुळे अमेरिकी नागरिकांचे नुकसान होत आहे आणि अमेरिका-भारत संबंध बिघडत आहेत.” रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या चीनवर ३० टक्के तर तुर्कीवर १५ टक्के आयातशुल्क लागू करण्यात आले आहे.