केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारच्या अन्न सुरक्षा कार्यक्रमावरून राजकारण न करण्याचा इशारा कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सोमवारी दिला. भोपाळमधील राजाभोज विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिग्विजयसिंह यांनी मोदींना हा इशारा दिला.
अन्न सुरक्षा विधेयक आधी संसदेत मांडण्यापेक्षा त्यासंबंधीचा अध्यादेश यूपीए सरकारने काढला. त्यावरून मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका केली. यूपीएतील घटक पक्षांना अन्न सुरक्षा कार्यक्रमाचे श्रेय मिळू नये, यासाठीच कॉंग्रेसने हे विधेयक संसदेत न मांडता त्यावर अध्यादेश काढला, असा आरोप मोदींनी पुण्यातील निर्धार सभेमध्ये रविवारी केला होता.
देशातील गरिबांना अन्न मिळावे, यासाठी अन्न सुरक्षा कार्यक्रमाबाबत अध्यादेश काढण्यात आल्याचे दिग्विजयसिंह यांनी स्पष्ट केले. मोदी यांनी या कार्यक्रमावरून कोणतेही राजकारण करू नये, असेही दिग्विजयसिंह म्हणाले.