Next Phase of Gaza peace plan : मागील दोन वर्षांपासून (७ ऑक्टोबर २०२३ पासून) चालू असलेलं इस्रायल व हमासमधील युद्ध आता पूर्णपणे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेत गाझा पट्टीत शांतता निर्माण व्हावी यासाठी २० कलमी कार्यक्रम मांडला होता. हा प्रस्ताव इस्रायल व हमासने स्वीकारला आहे. तसेर मध्य-पूर्व आशियामधील अनेक मुस्लीम राष्ट्रांसह चीन व फ्रान्सने त्यास पाठिंबा दर्शवला आहे. युद्धविरामाच्या कराराला इस्रायल आणि हमासने सहमती दर्शवल्यानंतर या कराराचा सुरुवातीचा एक भाग म्हणून ओलिसांची मुक्तता केली जात आहे. पहिल्या टप्प्यात हमास एकूण २० इस्रायली ओलिसांची सुटका करणार आहे. तसेच मृत्यूमुखी पडलेल्या ओलिसांचे मृतदेह देखील हमास परत करणार आहे.

इस्रायल २०० हून अधिक पॅलेस्टिनी कैदी व गाझामधून ताब्यात घेतलेल्या १७०० हून अधिक जणांची सुटका करणार आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांसह विविध देशांकडून गाझा पट्टीत पोहोचवली जाणारी मदत जी इस्रायलने रोखली होती ती मुक्त केली जाईल. त्यामुळे आता गाझा पट्टीतल्या लोकांना मदत मिळण्यास सुरुवात होईल.

सकाळी सात ओलिसांची सुटका

गाझा संघर्ष (PC : Reuters)

हमासने आज सात ओलीस नागरिकांना ‘रेड क्रॉस’कडे सोपवलं आहे. युद्धविरामाच्या कराराअंतर्गत सुटका झालेले हे पहिलेच ओलीस नागरिक आहेत. हमासने सात जणांना मुक्त केलं आहे. आणखी १३ जणांना पुढील काही तासांमध्ये मुक्त केलं जाईल. दरम्यान, इस्रायलही आता युद्धकैद्यांना सोडणार आहे.

शस्त्रसंधी लागू

(PC : Reuters)

पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशात शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) स्थानिक वेळेनुसार १२ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १० वाजता) शस्त्रसंधी लागू झाली. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीतून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला ओलिसांची देवाणघेवाण सुरू झाली.

पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी कशी असेल?

डोनाल्ड ट्रम्प – बिन्यामिन नेतान्याहू (AP Photo)

शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर पहिल्या ७२ तासांमध्ये हमास २० ओलिसांना मुक्त करेल. ओलिसांचं किंवा कैद्यांचं हस्तांतरण करताना कुठलाही समारंभ, जल्लोष केला जाणार नाही. ही देवाणघेणाव प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत होणार नाही. कारण यापूर्वी हमासने काही ओलिसांना सोडलं होतं तेव्हा मोठा मीडिया इव्हेंट केला होता. त्यावेळी काही ओलिसांना प्रसारमाध्यमांसमोर हमासबद्दल चांगलं बोलण्यास सांगितलं होतं. यावेळी असे प्रकार टाळले जातील.

मारवाँ बरघौती व अहमद सादतची सुटका

मारवाँ बरघौती (PC : Reuters)

इस्रायल ज्या कैद्यांची सुटका करणार आहे त्यामध्ये अनेक हाय प्रोफाइल नावं आहेत. मारवाँ बरघौती व अहमद सादत यांना देखील इस्रायल मुक्त करेल. मारवाँ बरघौती हे पॅलेस्टिनी विधान परिषदेचे सदस्य आहेत. बरघौती यांना सोडण्यास इस्रायल तयार नव्हतं. मात्र, अनेक तासांच्या वाटाघाटींनंतर इस्रायलच्या सरकारने बरघौती यांच्या नावाला मंजुरी दिली. तर, अहमद सादत हे पॅलेस्टाइनच्या मुक्तीसाठी लढणाऱ्या पॉप्युलर फ्रंटचे सरचिटणीस आहेत. इस्रायल या संघटनेला दहशतवादी संघटना मानते.

कसा असेल कराराचा पुढचा टप्पा?

(PC : Reuters)

ट्रम्प यांच्या २० कलमी कार्यक्रमातील पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर वाटाघाटी सुरू होतील. यामध्ये गाझामधून सर्व सैन्य हटवलं जाईल. लष्करी, दहशतवादी व इतर आक्रमक पायाभूत सुविधा नष्ट केल्या जातील. यावर सहमती होणं अवघड दिसत आहे. यावर दोन्ही बाजू सहमत झाल्या तर युद्ध तात्काळ संपेल.