Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात जो संघर्ष वाढतो आहे. त्यामध्ये मध्यस्थी करायची असेल तर मी तयार आहे कारण मी युद्धं थांबवण्यात आणि शांतता प्रस्थापित करण्यात एक्स्पर्ट आहे असं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं मी इस्रायल आणि हमास यांच्यातला संघर्ष थांबवला आहे. हे आठवं युद्ध आहे जे मी थांबवलं आहे. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनाही सांगू इच्छितो की तुमच्यातला संघर्ष थांबवून मध्यस्थी करायची असेल तर मी तयार आहे. मी युद्ध थांबवण्यातला तज्ज्ञ आहे आणि शांतता प्रस्थापित करण्यातही तज्ज्ञ आहे. अशा गोष्टी करणं हे ही माझ्यासाठी सन्मानाची आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष
डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य तेव्हा आलं आहे जेव्हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांच्या सीमांवर मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि सैन्यांच्या चकमकी सुरु आहेत. दोन्ही देशांमध्ये तणाव सुरु आहे. तसंच या दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. तालिबानने हा दावा केला आहे की पाकिस्तानचे ५८ सैनिक आम्ही मारले आहेत. तर पाकिस्तानने दावा केला आहे की त्यांनी अफगाणिस्तानच्या चौक्यांवर कब्जा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आजवर अनेकदा ही विधानं केली आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष मी थांबवायला तयार आहे असं म्हटलं आहे.
मी आठव्यांदा युद्ध थांबवलं आहे-डोनाल्ड ट्रम्प
मी आठव्यांदा युद्ध थांबवलं आहे. तसंच आत्तापर्यंत विविध देशांच्या संघर्षात मी मध्यस्थी केली आहे. युद्धविराम घडवून मी शांतता प्रस्थापित केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी असंही म्हटलं होतं की भारत आणि पाकिस्तान यांच्यातला युद्धविरामही मीच घडवून आणला आहे. त्यांनी अनेकदा हा दावा केला. अर्थात भारताने ही बाब मान्य केलेली नाही. भारत आणि पाकिस्तान संघर्षात कुणीही मध्यस्थी केली नाही असं भारताने म्हटलं आहे.
नेत्यानाहू यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुती
नेतान्याहू यांनी संसदेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांची भरभरून स्तुती केली. नेतान्याहू यांनी “ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्ये इस्रायलला लाभलेले आजपर्यंतचे सर्वात महान मित्र” असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “कोणत्याही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने इस्रायलसाठी यापेक्षा अधिक काही केलेले नाही.” पुढे बोलताना नेतान्याहू यांनी इस्त्रायलच्या सैनिकांचेही कौतुक केले, सैनिकांनी युद्धात हमासवर आश्चर्यचकित करणारे विजय मिळवले, असे ते म्हणाले.