२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील पाक हेराने दहशतवाद्यांना मदत केली होती असा धक्कादायक खुलासा ब्रिटनमधील दोघा पत्रकारांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. या पाक हेराचे नाव ‘हनी बी’ होते असे या पुस्तकात म्हटले असून यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.
ब्रिटनमधील पत्रकार एँड्री लेवी आणि कैथी स्कॉट क्लार्क या दोघा पत्रकारांनी सीज नामक एक पुस्तक लिहीले असून या पुस्तकात त्यांनी २६-११ च्या मुंबई हल्ल्यावर भाष्य केले आहे. ‘मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पाकचा हनी बी नामक हेर भारताच्या सुरक्षा यंत्रणेत काम करता होता. या हेराने सागरी मार्गाने मुंबईत येणा-या दहशतवाद्यांना मुंबईत आल्यावर जागा कशा ओळखायच्या याची माहिती पुरवली होती असा उल्लेख या पुस्तकात केला आहे.  या दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना भारताच्या समुद्र किनााऱ्यावर योग्य ठिकाणी उतरविण्याची जबाबदारी या डबल एजंटवर सोपविण्यात आली होती. त्यानेच दक्षिण मुंबईतील बधवार पार्कची माहिती पाकिस्तानी-अमेरिकी दहशतवादी डेव्हिल हेडलीच्या माध्यमातून “आयएसआय”ला दिली होती, असेही या पुस्तकात सांगण्यात आले आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. याचे अनेक पुरावे सापडले आहेत. भारतीय सरकारने यातील काही पुरावे पाकिस्तानी सरकारलाही दिले आहेत. या हल्ल्यात भारतीय गुप्तचर खात्यातील काही डबल एजंट सहभागी असल्याचे समजल्यावर अधिक सखोल चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.