सँडी वादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीने या वर्षी जगभरात मोठय़ा प्रमाणात हानी झाली असून जागतिक हवामानात होत असलेल्या बदलांबाबत शंका घेणाऱ्यांना ते चुकीचा विचार करीत असल्याचे दाखवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव बान कि मून यांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत केले. जागतिक हवामानात होणारे विपरीत बदल टाळण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मून यांनी या वेळी स्पष्ट केले.
दोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत मून यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या परिषदेला जगभरातील दोनशे राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर आहेत. या वेळी बोलताना मून म्हणाले की, जागतिक हवामानाबाबतच्या अहवालातून दिसून येते की, ग्रीन हाऊस वायूचे उत्सर्जन मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्याचा परिणाम जागतिक वातावरणावर होत असल्याचे जगभरातील वैज्ञानिकांचे मत आहे. या वर्षी मॅनहटन, बीजिंग पाण्याखाली गेल्याचे आपण पाहिले. कोलंबिया, पेरू, फिलिपाइन्स, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील लाखो नागरिक बेघर झाले. बर्फ वितळू लागला आहे, समुद्राची पातळी वाढत असून संपूर्ण जगभरात धोक्याची घंटा वाजल्याची भीती मून यांनी व्यक्त केली.
आपल्या भाषणानंतर पत्रकारांशी बोलताना बान म्हणाले की, जागतिक हवामान बदलाविषयी सुरू केलेल्या मोहिमेचे अमेरिकेने नेतृत्व स्वीकारण्याची गरज आहे, कारण त्यांच्याकडे अद्ययावत तंत्रज्ञान आणि साधनसामग्रीची मोठय़ा प्रमाणात उपलब्धता आहे.
भविष्यातील प्रदूषित वायूंचे उत्सर्जन कमी करणे, गरीब देशांना पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने मदत करणे आदी मुद्दय़ांवर दोहा परिषदेत भर देण्यात आला आहे. मोठय़ा प्रमाणात होणारे वायूंचे उत्सर्जन रोखण्याबाबत विकसित राष्ट्रे दिलेले आश्वासन पाळत नसल्याचा आरोप विकसनशील राष्ट्रे सातत्याने करीत आहेत.
दरम्यान, जागतिक पातळीवर हवामान बदलाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेसाठी इंग्लंडने भरीव योगदान देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे विकसित राष्ट्रांच्या गटानेदेखील जागतिक हवामान बदलाच्या मोहिमेत ठोस भूमिका बजावण्याची शपथ घेतल्याची माहिती ऑक्सफॅम हवामान बदल धोरणाचे सल्लागार ट्रेसी कार्टी यांनी दिली.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वर्षी मॅनहटन, बीजिंग पाण्याखाली गेल्याचे आपण पाहिले. कोलंबिया, पेरू, फिलिपाइन्स, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील लाखो नागरिक बेघर झाले. बर्फ वितळू लागला आहे, समुद्राची पातळी वाढत असून संपूर्ण जगभरात धोक्याची घंटा वाजली आहे – मून

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doubt health due changing weather