छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा असणाऱ्या नारायणपूरमध्ये बुधवारी सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये मोठी चकमक झाली आहे. जंगल परिसरात गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांवर लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या गोळीबारात जिल्हा राखीव रक्षकच्या (DRG) एका हेड कॉन्स्टेबलला वीरमरण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना छोटेडोंगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुलारगुफा-मुंगारी परिसरातील जंगलात बुधवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास घडली. यावेळी विविध सुरक्षा दलांचं संयुक्त पथक जंगल परिसरात गस्त घालत होतं. त्याचवेळी अचानक हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी पीटीआयला दिली.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी डीआरजी आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) च्या पथकानं संयुक्तपणे नारायणपूर-दंतेवाडा आंतरजिल्हा सीमेवरील पल्ली-बरसूर परिसरात कारवाईला सुरुवात केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी डीआरजीचं गस्ती पथक तुलारगुफा-मुंगारी परिसरातील जंगलात गस्त घालत होतं.

तेव्हा अचानक नक्षलवाद्यांच्या एका गटाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात डीआरजीचे ३७ वर्षीय हेड कॉन्स्टेबल सालिक राम मरकम यांना समोरासमोर गोळ्या लागल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या घटनेनंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drg jawan died in naxal attack in narayanpur chhattisgarh on wednesday rmm