हैदराबाद शहरातील नेहरू प्राणी संग्रहालयात रविवारी घडलेल्या एका घटनेत मद्याच्या प्रभावाखाली असलेल्या एका ३५ वर्षीय व्यक्तीने प्राणी संग्रहालयातील सिंहीणीबरोबर हात मिळविण्यासाठी संरक्षक भित ओलांडून आत प्रवेश केला. प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत वेळीच त्याला बाहेर काढले. मुळचा राजस्थानच्या सीकार जिल्ह्यात राहणारा मुकेश सुरक्षारक्षकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत आफ्रिकन सिंहांना ठेवण्यात आलेल्या ठिकाणची संरक्षक भिंत पार करून आत गेल्याची माहिती प्राणी संग्रहालयाच्या कर्मचारी शिवानी डोगरा यांनी दिली. संरक्षक भिंत पार करून आत आलेल्या मुकेशला पाहताच राधिका नावाची सिंहीण आणि एक सिंह त्याच्या जवळ आले. या सिंहांची देखभाल करणारा कर्मचारी आर पपैयाने प्रसंगावधान राखत मुकेशला वेळीच त्यांच्या तावडीतून वाचवले. सिंहांची देखभाल करणाऱ्या पपैयाने राधिका आणि अन्य सिंहाला तेथून पळवून लावत मुकेशला मोठ्या धोक्यातून वाचविल्याची माहिती प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्याने दिली. मद्यधुंद अवस्थेतील मुकेशने सिंहीणीजवळ जाण्यासाठी संरक्षक भिंत पार केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आल्याचेदेखील त्याने सांगितले. ‘एल अॅंड टी’द्वारे सुरु असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी मजुराचे काम करणाऱ्या मुकेशला बहाद्दुरपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुकेशवर घुसखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बहाद्दुरपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक हरीश कौशिक यांनी दिली. तेलगु न्यूज चॅनलचा व्हिडिओ येथे देण्यात आला असून, मुकेश संरक्षक भिंत पार करून आत गेल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. आपण सिंहिणीची भेट घेण्यासाठी आत गेल्याचे सांगतानादेखील तो दिसतो.

(Video Credit: ABN Telugu/Youtube)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk man jumps into lion cage in hyderabad