नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी अटक केली़  या कारवाईचे तीव्र पडसाद उमटत असून, आम आदमी पक्षाने भाजपला लक्ष्य केल़े 

‘ईडी’ने सत्येंदर जैन आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांच्या ४ कोटी ८१ लाख रुपयांच्या मालमत्तांवर एप्रिलमध्ये टाच आणली होती़  आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने ही कारवाई केली होती़  भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार सीबीआयने २०१७ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ‘ईडी’ने या प्रकरणाचा तपास केला़

या प्रकरणी सीबीआयने जैन यांची चौकशीही केली होती़  मात्र, चार कंपन्यांकडे प्राप्त झालेल्या निधीचे स्रोत काय आहेत, याबाबत ते स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, असे सीबीआयचे म्हणणे आह़े  तसेच ‘ईडी’नेही २०१८ मध्ये या प्रकरणी जैन यांची चौकशी केली होती़

जैन यांच्याकडे आरोग्य खात्याबरोबरच उद्योग, ऊर्जा, नगरविकास आणि पाणीपुरवठा ही खाती आहेत़ दरम्यान, या कारवाईनंतर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीकास्त्र सोडल़े  ‘‘जैन यांना याआधी सात वेळा ‘ईडी’कडून समन्स बजावण्यात आले होत़े  मात्र, अटकेची कारवाई झाली नव्हती़  मात्र, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षाची बदनामी करण्यासाठी आता ही कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप सिंह यांनी केला़  या प्रकरणात आधी सीबीआयने जैन यांना निर्दोषत्व बहाल केले होते, असा दावा त्यांनी केला़  आम आदमी पक्षाविरोधात सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्यात येत असल्याचा आरोपही सिंह यांनी केला़

राजकीय सूडातून कारवाई – आप

आठ वर्षांपूर्वीच्या खोटय़ा गुन्ह्यात जैन यांना अटक करण्यात आल्याचा आरोप करत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपला लक्ष्य केल़े  हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत़  तिथे आम आदमी पक्षाचा प्रभार जैन यांच्याकडे असून, भाजपला पराभवाची भीती आह़े  त्यामुळेच ही कारवाई झाल्याचा दावा त्यांनी केला़

आपला धक्का

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आम आदमी पक्षाने गेल्याच आठवडय़ात विजय सिंगला यांना पंजाबच्या आरोग्यमंत्रीपदावरून बडतर्फ केले होत़े  भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश पक्षाने या कारवाईतून दिला होता़  मात्र, दिल्लीत भ्रष्टाचारावरूनच आरोग्यमंत्र्याला अटक झाल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आह़े