इजिप्तचे माजी हुकूमशहा होस्नी मुबारक यांची गुरुवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. भ्रष्टाचार आणि निदर्शकांना ठार केल्याच्या आरोपाखाली मुबारक यांना दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. खटल्याची अद्याप सुनावणी बाकी असल्यामुळे तुरुंगातून बाहेर आलेल्या ८५ वर्षीय मुबारक यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे.
न्यायालयाने सुटकेचे आदेश दिल्यानंतर कैरोच्या टोरा कारागृहातून मुबारक यांना हेलिकॉप्टरमधून माडी येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. तेथेच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. कैरो न्यायालयाने बुधवारी आदेश दिल्यानंतर त्यांची गुरुवारी सुटका करण्यात आली. मुबारक यांच्या सुटकेच्या वेळी त्यांच्या समर्थकांचा गट तुरुंगाबाहेर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होता.
दरम्यान, इजिप्तमध्ये सध्या सुरू असलेला हिंसाचार आणि गेल्या आठवडय़ात पदच्युत राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी समर्थकांवर लष्कराने केलेली कठोर कारवाई या पाश्र्वभूमीवर मुबारक यांची सुटका झाल्यामुळे इजिप्तमधील अनेक गटांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुबारक यांच्या सुटकेच्या निषेधार्थ येथील युवकांच्या संघटनेने शुक्रवारी निषेध मोर्चाचे आवाहन केले आहे.
मुबारक यांच्यावर २०११ च्या आंदोलनादरम्यान ८०० निदर्शकांची हत्या करण्याचा आणि तीन भ्रष्टाचाराच्या गुन्ह्य़ांबाबत खटले सुरू आहेत. मुबारक यांनी खटल्याआधी आधीच दोन वर्षे तुरुंगात शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्यांची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र, पंतप्रधान बेबलाई यांनी मुबारक यांच्या सुटकेनंतरही त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Aug 2013 रोजी प्रकाशित
मुबारक यांची तुरुंगातून सुटका
इजिप्तचे माजी हुकूमशहा होस्नी मुबारक यांची गुरुवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. भ्रष्टाचार आणि निदर्शकांना ठार केल्याच्या आरोपाखाली मुबारक यांना दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती.
First published on: 23-08-2013 at 04:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Egypt clears conditional release of mubarak from jail