eight students hospitalized after classmates put instant glue into their eyes : शाळा-कॉलेजच्या हॉस्टेल्समध्ये रात्री विद्यार्थी बऱ्याचदा मस्ती करतात. मात्र अशी मस्ती कधीकधी जीवावर बेतू शकते. असाच काहीसा प्रकार ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये घडला आहे. येथे विद्यार्थ्यांना एक प्रँक चांगलीच महागात पडली. येथे काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गमित्रांच्या डोळ्यांना इन्स्टंट ग्लू लावले, ज्यामुळे त्यांच्या पापण्या चिकटल्या. या प्रकारानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांवर आता उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
कंधमालमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत घडला ही भयंकर घटना घडली. तिसरी, चौथी आणि पाचवीमध्ये शिकणारे आठ विद्यार्थी रात्री वसतिगृहात झोपलेले होते. यावेळी त्यांच्या काही वर्गमित्रांनी त्यांच्या डोळ्यांना इन्स्टंट ग्लू लावले. विद्यार्थी जागे झाल्यानंतर त्यांना वेदना आणि जळजळ जाणवू लागल्या तसेच त्यांच्या डोळ्याच्या पापण्या बंद झाल्याचे आढळून आले. त्यांनी आरडाओरड केल्याने हॉस्टेल प्रशासन सावध झाले, ज्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना फुलबनी येथील जिल्हा रुग्णालयातील विशेष काळजी विभागात दाखल करण्यात आले.
या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून यामध्ये मुलांचे डोळे बंद असल्याचे पाहायला मिळले, तर काही जण रडताना दिसून आले. तर डॉक्टर काळजीपूर्वक त्यांच्या पापण्या वेगळ्या करताना दिसत आहेत. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, चिकट पदार्थामुळे डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे, पण वेळेवर उपचार मिळाल्याने मुले दृष्टी कायमची गमावण्यापासून बचावले आहेत. एका विद्यार्थ्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, इतर सात विद्यार्थ्यांना अजूनही निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने शाळेचे मुख्याध्यापक मनोरंजन साहू यांना हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. असा प्रकार नेमका घडला कसा, याची सखोल चौकशी करण्यासाठी एक उच्च-स्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
एका डिस्ट्रिक्ट चाइल्ड वेलफेअर अधिकाऱ्याने रुग्णालयाला भेट देत विद्यार्थ्यांची तपासणी केली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.