काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर सशस्त्र दरेडोखोरांचा सामना करणाऱ्या एका आजी-आजोबांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. वृद्द दांपत्याने दाखवलेल्या धाडसामुळे दरोडेखोरांना पळ काढावा लागला होता. तामिळनाडू सरकारने गुरुवारी वृद्ध दांपत्याच्या धाडसाचं कौतुक केलं असून शौर्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. तिरुनेलवेली जिल्ह्यात ही घटना घडली होती.
शानमुगवेल हे लिंबूचे होलसेल डीलर आहेत. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या हस्ते शानमुगवेल (७०) आणि सेंथमराई (६५) यांना विशेष शौर्य पुरस्कार देण्यात आला असून सोबत २ लाखांची रोख रक्कम आणि गोल्ड मेडल्स देण्यात आली आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. तिरुनेलवेलीच्या जिल्हाधिकारी शिल्पा प्रभाकर सतीश यांनी शौर्य पुरस्कारासाठी वृद्ध दांपत्याच्या नावाची शिफारस केली होती.
“मुख्यमंत्री आपल्याशी संपर्क साधतील आणि स्वत: घटनेबद्दल चौकशी करतील याचा आम्ही विचारही केला नव्हता. आम्हाला खूप आनंद झाला असून उत्साहित आहोत. प्रत्येकाने आपलं घर आणि आजुबाजूचा परिसर सुरक्षित राहावा यासाठी घरात सीसीटीव्ही लावलं पाहिजे”, अशा भावना वृद्ध दांपत्याने व्यक्त केल्या आहेत.
काय होती घटना ?
तामिळनाडूमधील तिरुनेलवेली येथे दांपत्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला होता. सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे, शानमुगवेल फार्महाउसच्या बाहेर वरांड्यात बसले असताना दरोडेखोर मागून येतो आणि त्यांच्यावर हल्ला करत गळा दाबण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी दुसरा एक दरोडेखोर येतो. दोघे शनमुगवेल यांना मारहाण करत असतात. होणारा गोंधळ ऐकून शानमुगवेल यांची पत्नी बाहेर येते. बाहेर येताच त्या दरोडेखोरांवर अक्षरश: तुटून पडतात. चप्पल, खुर्ची हातात जे काही मिळेल ते उचलून त्या दरोडेखोरांचा सामना करतात. वृद्ध दांपत्याची हिमत पाहून दरोडेखोरही पळ काढतात.