पीटीआय, नवी दिल्ली
कथित बनावट विदेशी मुद्रा व्यापार आणि ठेव योजनेतील प्रवर्तकांकडे छापे टाकल्यानंतर १७० कोटी रुपयांच्या बँक ठेवी गोठवल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी दिली. ‘क्यूएफएक्स ट्रेड लिमिटेड’ आणि तिचे संचालक राजेंद्र सूद, विनीत कुमार आणि संतोष कुमार याशिवाय मुख्य सूत्रधार नवाब अली ऊर्फ लविश चौधरी यांच्याविरोधात तपासाचा भाग म्हणून, ११ फेब्रुवारी रोजी दिल्ली, उत्तर प्रदेशातील नोएडा आणि शामली, हरियाणातील रोहतक येथील विविध भागांत हे छापे टाकण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिमाचल प्रदेश पोलिसांनी ‘क्यूएफएक्स’ कंपनीविरुद्ध दाखल केलेल्या अनेक ‘एफआयआर’मधून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सुरू झाला. यामध्ये बनावट ‘फॉरेक्स ट्रेडिंग’ योजनेद्वारे अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ‘क्यूएफएक्स’ कंपनी आणि तिचे संचालक एक अनियमित ठेव योजना चालवत आहेत, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे वचन देण्यात आले होते, असा आरोप ईडीने केला आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार ‘क्यूएफएक्स’ समूह कंपन्यांच्या दलालांनी ‘क्यूएफएक्स’च्या नावाने ‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’ (एमएलएम) योजना आणून आणि विदेशी मुद्रा व्यापाराच्या नावावर उच्च दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी संकेतस्थळ, अॅप्स आणि सोशल मीडिया जाहिराती तयार केल्या.

पोलिसांकडे ‘एफआयआर’ दाखल केल्यानंतर ईडीला आढळले की, ‘क्यूएफएक्स’ योजनेचे नाव बदलून ‘वायएफएक्स’ (यॉर्कर एफएक्स) करण्यात आले आणि त्याच पद्धतीनुसार उच्च परताव्याच्या आमिषाने निष्पाप गुंतवणूकदारांची फसवणूक केली. यानंतर ‘क्यूएफएक्स’द्वारे अनेक योजना चालवण्यात येऊ लागल्या आणि त्यांचे नियंत्रण लविश चौधरी करत होता. अधिकाधिक ग्राहक गोळा करण्यासाठी भारतासह दुबईतही काही कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे ईडीला आढळले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enforcement directorate seize 170 crores fixed deposits in the alleged fake forex trading case css