सगळेच दलितांवर होणा-या अत्याचारांविषयी बोलतात पण त्यांना न्याय कधीच मिळत नाही. दलितांवर देशांत अत्याचार सुरू आहेत त्यांना न्याय मिळणे तर सोडाच पण अनेक प्रकरणात साधा गुन्हाही नोंदवला जात नाही. गुजरात येथील उनामधील दलित माहराण प्रकरणाचे उदाहरण देत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राज्यसभेत देशांतील दलित अत्याचाराचा मुद्दा उचलून धरला. यावेळी दलितांवर झालेल्या अत्याचाराची आकडेवारी देखील त्यांनी सभागृहात मांडली.
‘स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली. राज्यघटना तयार होऊन ६६ वर्षे उलटली तरी देशात दलित अत्याचारांचे प्रमाण कमी झाले नाही. या देशाची घटना बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली. घटनेतील त्यांचा वाटा महत्त्वपूर्ण होता. असे असताना देखील देशातील दलित जनतेला त्यांच्या हक्कांपासून उपेक्षित राहावे लागते आहे. दलितांना ५० टक्के सुविधासुद्धा देशात मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
देशात काँग्रेसची सत्ता अधिक काळ होती. भाजप देखील दीर्घकाळ सत्तेत होता पण दोन्ही सरकारला दलितांना पूर्णपणे न्याय मिळवून द्यायला यश आले नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली. तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष अधिक काळ देशाची सत्ता चालवत होता पण दलितांच्या उद्धारासाठी या पक्षाने फारसे प्रयत्न केले नाही, असा आरोप करत त्यांनी काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले.
गुजरातमधील उना येथील दलित मारहाण प्रकरणाचे पडसाद सलग गुरुवारीही राज्यसभेत उमटले. दलितांना योग्य तो न्याय देण्याची मागणी मायावतींनी लावून धरली.