फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला. मार्कला आज दुसरे कन्यारत्न प्राप्त झाले असून त्याने तिचे ‘ऑगस्ट’ असे नामकरणही केले आहे. मार्कने स्वत: फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती जगासमोर आणली. मार्क आणि प्रिसिला या दाम्पत्याला या आधीही एक मुलगी असून तिचे नाव मॅक्सिमा असे आहे. पत्नीच्या दुसऱ्या बाळंतपणासाठी तो मागील दोन महिन्यांपासून सुटीवर होता. यापूर्वीच मार्कने आपल्याला दुसरी मुलगी होणार असल्याचे जाहीर केले होते. मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करताना त्याने ‘ऑगस्ट’च्या नावे एक भावनात्मक पत्रही लिहिले आहे. त्याचबरोबर मार्कने पत्नी प्रिसिला, मुलगी मॅक्सिमा आणि ऑगस्ट यांचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
ऑगस्टंचं स्वागत करताना मला आणि प्रिसिलाला अत्यंत आनंद होत असल्याचे त्याने पत्राच्या सुरूवातीला म्हटले आहे. मार्कने आपल्या पत्रात म्हटले (मार्कने मुलींना संबोधून लिहिलेल्या पत्राचा सार)..,
प्रिय ऑगस्ट, या जगात तुझं स्वागत आहे. तुझी आई आणि मी खूप उत्साहित झालो आहोत. जेव्हा तुझ्या बहिणीने या जगात पाऊल ठेवले होते. तेव्हाही मी एक पत्र लिहिले होते. मला आशा आहे की, तु आणि ती तुम्ही दोघे चांगले शिकाल. सुदृढ समाजात तुम्ही मोठे व्हाल. तुमची पिढी आमच्यापेक्षाही चांगले जीवन जगेल. पण मला वाटतं आपण कस जीवन जगायचं यावर बोलण्यापेक्षा बालपणाबद्दल चर्चा केलेलं चांगलं होईल. तुम्ही बाहेर जा आणि मनसोक्त खेळा.
तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा दैनंदिन जीवनात व्यस्त असाल. त्यामुळं फुलांचा सुंगध घेण्यासाठी आत्ताच वेळ काढा. मला आशा आहे की, तुम्ही तुमचे आवडते लेखक डॉ. सेसूस यांची भरपूर पुस्तके वाचाल. बालपण हे जादुई असते. तुम्हाला एकदाच बालपणाचा आनंद घेता येतो. त्यामुळे भविष्यात काय होईल याचा विचार करण्यात वेळ घालवू नका. ऑगस्ट आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, तुझेच आई-वडील!, असा शेवट मार्कने आपल्या पत्रात केला आहे.