‘डीएमडीके’ला दर्शविलेला विरोध भोवला
द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी पक्षाचे मदुराईचे खासदार आणि आपले पुत्र एम. के. अळगिरी यांची पक्षातील सर्व पदांवरून उचलबांगडी केली असून त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही तात्पुरते निलंबित केल्याने पक्षात आणि करुणानिधी यांच्या कुटुंबात सर्व आलबेल नसल्याचे संकेत मिळाले आहेत. डीमएके-डीएमडीके युतीला अळगिरी यांनी केलेला विरोध सहन केला जाणार नाही, असा इशाराच अळगिरी यांना देण्यात आला आहे.
पक्षश्रेष्ठी करुणानिधी यांनी घेतलेल्या निर्णयाचे प्रतिबिंब या बाबत प्रसृत करण्यात आलेल्या निवेदनात आहे, असे पक्षाचे सरचिटणीस के. अंबाझगन यांनी वार्ताहरांना सांगितले. डीएमडीकेसमवेत युती करण्यास करुणानिधी उत्सुक होते. त्यामुळे अळगिरी यांनी या युतीला केलेला विरोध आणि पक्षाचे संस्थापक विजयकांत यांच्यावर केलेल्या टीकेपासून करुणानिधी दूर राहिले होते.
युतीसारख्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण निर्णयांना ज्यांचा विरोध असेल त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टी करण्यासह शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा करुणानिधी यांनी दिला होता. अळगिरी यांनी करुणानिधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर काही वेळातच त्यांच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई झाली़
डीएमडीके पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या पक्षासमवेत युती करणार त्याची घोषणा विजयकांत हे येत्या २ फेब्रुवारी रोजी करणार असून त्यापूर्वी काही दिवसच अळगिरी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. डीएमडीकेसमवेत निवडणुकीत युती करण्याचा आटोकाट प्रयत्न द्रमुक आणि भाजपने केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘करुणापुत्र’ अळगिरी द्रमुकतून निलंबित
द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी पक्षाचे मदुराईचे खासदार आणि आपले पुत्र एम. के. अळगिरी यांची पक्षातील सर्व पदांवरून उचलबांगडी केली असून त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही तात्पुरते निलंबित केल्याने
First published on: 25-01-2014 at 02:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Family feud spills over in dmk karunanidhi suspends alagiri