भारतीय अन्न महामंडळाच्या fci.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून महामंडळातील विविध जागांसाठी अॅडमिट कार्ड्स जाहीर करण्यात आली आहेत. भारतीय अन्न महामंडळातील विविध रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांनी वेबसाईटवर जाऊन अॅडमिट कार्ड डाउनलोड करावे असे मंडळाकडून सांगण्यात येत आहे.

सध्या भारतीय अन्न महामंडळात एकूण ४१०३ जागा रिक्त आहेत. या जागांच्या भरतीसाठी भारतीय अन्न महामंडळाने परीक्षा जाहीर केल्या आहेत. महामंडळात आता ज्युनिअर इंजिनिअर, स्टेनो, टायपिस्ट, असिस्टंट (ग्रेड २ आणि ग्रेड ३) या जागांसाठी भरती सुरू आहे. उमेदवारांना असे सांगण्यात आले आहे की, त्यांनी लवकरात लवकर महामंडळाच्या वेबसाईटला भेट देऊन त्यांचे कॉल लेटर डाउनलोड करावे. ही परीक्षा ऑनलाईन होणार असून त्यासाठी उमेदवारांकडे कॉल लेटर असणे आवश्यक आहे. कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी साईटवर स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकणे आवश्यक आहे.

भारतीय अन्न महामंडळाच्या भरतीसाठी अॅडमिट कार्ड कसे डाउनलोड करावे ?

१) भारतीय अन्न महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट fci.gov.in ला भेट द्यावी.
२) होम पेजवरील ‘अॅडमिट कार्ड’ या लिंकवर जावे.
३) जन्मतारीख आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर स्क्रीनवर अॅडमिट कार्ड दिसेल.
४) अॅडमिट कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट परीक्षार्थीनं जवळ बाळगावी.

परीक्षाकेंद्रावर जाताना खालील बाबी लक्षात ठेवा –
१) उमेदवारांनी न विसरता कॉल लेटर परीक्षाकेंद्रावर नेणे अत्यावश्यक आहे.
२) कॉल लेटरवर उमेदवारांनी स्वतःचा फोटो लावणे गरजेचे आहे.
३) नावनोंदणी करताना उमेदवारांनी जो फोटो वापरला असेल, तोच फोटो कॉल लेटरवर असावा.
४) उमेदवारांकडे स्वतःचे ओळखपत्र आणि त्या ओळखपत्राची फोटोकॉपी असावी.