पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले जवान संदीप सिंह रावत यांचे पार्थिव उत्तरखंडमधील त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांच्या मनातील संताप उफाळून आला. यावेळी स्थानिकांकडून ‘पाकिस्तानला संपवा’ अशा घोषणा देण्यात आल्या.

शनिवारी सकाळी १० च्या सुमारास रावत यांचे पार्थिव पौरी गढवाल जिल्ह्यातील गोरपाला तल्ला गावात आणण्यात आले. त्याआधी नवी दिल्लीतून हवाई मार्गाने त्यांचे पार्थिव देहरादून विमानतळावर आणण्यात आले. याच ठिकाणी त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री हरिश रावत यावेळी उपस्थित होते.

एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये रावत यांच्या मूळ गावातील एक महिला दिसत आहे. रावत यांना अंतिम निरोप देण्यासाठी ही स्थानिक महिला उपस्थित होती. यावेळी या महिलेने पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या. आपल्याला सीमेवर पाठवण्यात यावे, असेदेखील ही महिला व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

‘आमची तरुण मुले शहीद होत आहेचृत. आम्हालादेखील सीमेवर पाठवा. आम्हीदेखील पाकिस्तानविरोधात संघर्ष करु’, असे ही महिला व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

यावेळी उपस्थित असणाऱ्या मुख्यमंत्री हरिश रावत यांनी ‘पाकिस्तानला धडा शिकवायला हवा’, अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.

शुक्रवारी दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात जवान संदीप सिंह रावत शहीद झाले. जम्मू काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये त्यांना वीरमरण आले. रावत यांच्या मृतदेहाची दहशतवाद्यांकडून विटंबना करण्यात आली. त्यामुळे भारतीय सैन्यामध्ये संतापाची लाट आहे. शनिवारीदेखील सीमा सुरक्षा दलाचा एक जवान पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झाला. दोन दिवसांमध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जाते आहे.