उडुपी जिल्ह्यातील शासकीय कनिष्ठ महिला महाविद्यालयातील काही शिक्षकांना कथितरीत्या धमकावणाऱ्या कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय) या संघटनेच्या सदस्यांविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला असल्याची माहिती कर्नाटक सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली.

 न्यायालयाची कार्यवाही सुरू होताच, ज्येष्ठ वकील एस.एस. नागानंद यांनी एका संघटनेविरुद्ध केलेल्या निवेदनाच्या संबंधात एफआयआर नोंदवण्यात आला असल्याचे महाधिवक्ता प्रभुलिंग नावदगी यांनी सांगितले. सीएफआयशी संबंधित तपशील आपण बंद लिफाफ्यात न्यायालयाला सादर केल्याचेही ते म्हणाले. राज्यातील हिजाब वादाच्या संबंधात सीएफआय या संघटनेची भूमिका काय याबाबत माहिती देण्यास न्यायालयाने बुधवारी सरकारला सांगितले होते. हिजाब घालून वर्गात बसण्यास परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ  एका महाविद्यालयातील ६ विद्यार्थिनींनी १ जानेवारीला सीएफआय या संघटनेच्या पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली होती.

प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्याची हिजाबसमर्थक विद्यार्थिनींची मागणी
मंगळुरू : २८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आपल्या प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलाव्यात, असे आवाहन आपल्याला हिजाब घालून वर्गात बसू द्यावे या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या उडुपीतील शासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनींनी प्री- युनिव्हर्सिटी बोर्डाला केले आहे. हिजाब घालून वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे आपल्याला गेल्या दोन महिन्यांपासून वर्गात बसता आलेले नाही आणि त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला आणखी वेळ हवा आहे, असे या विद्यार्थिनींनी त्यांच्या विनंती अर्जात म्हटले आहे.