जम्मू काश्मीरमध्ये शाळांना समाजकंटकांनी लक्ष्य केल्यानंतर आता शाळेतील शिक्षकांवरच शाळेच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. शाळांमध्ये सुरक्षारक्षक नेमावे आणि सुरक्षा रक्षक नेमले नसतील तर शाळेच्याच एखाद्या कर्मचा-यावर सुरक्षेची जबाबदारी सोपवावी असे निर्देश शिक्षण अधिका-यांनी दिले आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयावर काश्मीरमधील शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानीचा जुलैमध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत खात्मा करण्यात आला. या घटनेनंतर जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु आहे. यात भर म्हणजे गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांनी शाळांनाही लक्ष्य केले असून राज्यातील २९ शाळांमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनांमुळे राज्यातील लाखो मुलांचे शिक्षण बंद पडले आहे. शाळांवरील हल्ल्यांची दखल जम्मू काश्मीर हायकोर्टानेही घेतली आणि राज्य सरकार, पोलीस तसेच शिक्षण विभागाला शाळेचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले. पण शिक्षण विभागाने आता शिक्षकांवरच सुरक्षेची जबाबदारी दिली आहे.
श्रीनगरमधील मुख्य शिक्षणाधिकारी आरिफ इक्बाल मलिक यांनी १ नोव्हेंबररोजी परिपत्रक काढून शाळांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित केली आहे. शाळेत २४ तास सुरक्षा रक्षक नेमावे आणि तो उपलब्ध नसेल तर शाळेच्याच एखाद्या कर्मचा-यावर याची जबाबदारी द्यावी असे या परिपत्रकात म्हटले आहे. शाळेच्या सुरक्षेसंदर्भात नुकतीच एक बैठक झाली होती. यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी नसलेल्या शाळांमध्ये शिक्षकांनाच शाळेच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे लागेल असे ठरल्याचे मलिक यांनी सांगितले.जम्मू काश्मीरमध्ये २० टक्क्यांहून कमी शाळांमध्ये सुरक्षा रक्षक आहेत. शिक्षण विभागाच्या फतव्यातून महिला शिक्षकांनाही दिलासा मिळालेला नाही. महिला शिक्षकांना शक्य नसेल तर त्यांनी त्यांच्या घरातील एखाद्या पुरुषाला रात्रपाळीसाठी शाळेत पाठवावे असे तोंडी आदेश देण्यात आल्याचे एका मुख्याध्यापकाने सांगितले.
राज्यातील काही शाळांनी याची अंमलबजावणीही केली आहे. एक – एक आठवड्यासाठी शिक्षकांना रात्रपाळीत शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम बघावे लागत आहे. जम्मू काश्मीरमधील शिक्षणमंत्री नईम अख्तर यांनी अशा स्वरुपाचे कोणतेही आदेश आम्ही दिलेले नाहीत असे सांगितले. पण स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतला असावा असे त्यांनी नमूद केले. रात्रपाळीत महिला शिक्षकांना सुरक्षेची जबाबदारी देण्यावरुनही नाराजी पसरली आहे. रात्रपाळीत महिला शिक्षकांच्या सुरक्षेचे काय असा सवालही उपस्थित होत आहे. शाळांमध्ये पोलीस का नेमले जात नाही असा प्रश्न पोलीस अधिका-यांना विचारला असता त्यांनी अपुरे मनुष्यबळाचे कारण दिले. राज्यात १३ हजार शाळा असून यातील प्रत्येक शाळेत पोलीस कर्मचारी नेमणे अशक्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.