जम्मू- श्रीनगर महामार्गावरील ब्रिजबेहरानजीक सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बीएसएफचे तीन जवान मारले गेले.
ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या बीएसएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी ब्रिजबेहरानजीकच्या गल्ल्यांमधून गोळीबार केला, असे जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक के. राजेंद्र यांनी सांगितले.
२३ वाहनांचा समावेश असलेला बीएसएफचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे जात होता. सुटय़ांनंतर कामावर रुजू होण्यासाठी जवान या वाहनांमधून प्रवास करत होते.
येथून ५२ किलोमीटर अंतरावरील एका सरकारी रुग्णालयाजवळ शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झालेल्या घटनेत हवालदार गिरीशकुमार शुक्ला व दिनेश आणि शिपाई महिंदर राम हे तिघे ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बीएसएफचे महासंचालक के.के. शर्मा हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहचले आहेत. या ठिकाणी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली असून या संपूर्ण भागाला केंद्रीय राखीव पोलीस दल व राष्ट्रीय रायफल्स यांनी वेढा घातला आहे.
अद्याप कुठल्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तथापि, बुऱ्हान वाणी याच्या नेतृत्वातील बंदी घातलेल्या हिज्बुल मुजाहिदीनच्या लोकांचे हे कृत्य असावे असा सुरक्षा दलांचा अंदाज आहे.