मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यावेळी भारतीय सुरक्षा यंत्रणाकडून राबविण्यात आलेल्या मोहीमेचा भाग असलेला आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) कमांडोला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. बहु-राज्यीय तस्करीचा त्याच्यावर आरोप आहे. राजस्थान पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी याबाबतची माहिती दिली. आरोपी बजरंग सिंग याला बुधवारी रात्री गांजा तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याबाबत अटक करण्यात आली.

बजरंग सिंग याला चुरू येथील रतनगड येथून ताब्यात घेण्यात आले. तेलंगणा आणि ओडिशामधून राजस्थानमध्ये गांजाची तस्करी करण्याच्या गुन्ह्यात त्याचा समावेश होता. पोलीस महानिरीक्षक विकास कुमार यांनी सांगितले की, सिंग याच्याकडून तब्बल २०० किलो गांजा हस्तगत करण्यात आला.

कुमार यांनी पुढे म्हटले की, मुळचा राजस्थानमधील सिकर जिल्ह्याचा असणाऱ्या बजरंग सिंगवर २५ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

माजी कमांडो अंमली पदार्थांचा तस्कर कसा झाला?

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांमध्ये कोलंबियाचा कुख्यात तस्कर पाब्लो एस्कोबारचे नाव कुप्रसिद्ध आहे. बजरंग सिंग यानेही त्याच्यासारखेच सामान्य परिस्थितीतून अंमली पदार्थांच्या काळ्या जगात पाऊल टाकले. दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिंग एनएसजीमध्ये सामील झाला. २००८ साली मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याविरोधात आखलेल्या मोहिमेत तो कमांडो पथकाचा भाग होता.

२०२१ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्याने राजकारणात नशीब अजमावले. पण त्यात त्याला पराभावाचा सामना करावा लागला. त्यानंतर तो संघटीत अमली पदार्थांच्या तस्करीकडे वळला. काही काळाताच तो गांजाची तस्करी करणारा कुख्यात डॉन बनला.

अटक करण्याचा सिनेस्टाईल थरार

राजस्थानच्या दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ) यांच्या सहकार्याने केलेल्या प्रयत्नातून ही अटक करण्यात आली. या मोहीमेला ऑपरेशन गांजने असे सांकेतिक नाव देण्यात आले होते.

माजी एनएसजी कमांडोच्या एका विचित्र सवयीमुळे तो पकडला गेला. आरोपी सिंग हा नेहमी त्याच्या ओडिशाच्या स्वयंपाकीबरोबर प्रवास करायचा. दोन महिन्यांपूर्वी यंत्रणांना ही टीप मिळाली. तिथून पुढे सिंगला पकडण्यासाठी जाळे विणण्यात आले.

सुरक्षा यंत्रणांना ओडिशाच्या स्वयंपाकीच्या नातेवाईकांबद्दल तांत्रिक माहिती मिळाली. त्याच्या माध्यमातून ते रतनगडमधील सिंग लपलेल्या ठिकाणी पोहोचले आणि तिथून त्याला अटक करण्यात आली.

सिंग याच्या अटकेमुळे, ओडिशा आणि तेलंगणामधून राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बेकायदेशीर ड्रग्ज तस्करीला आळा बसेल अशी आशा पोलिसांना आहे.