फ्रान्सचे नवनियुक्त पंतप्रधान सेबास्टियन लुकॉर्नू यांनी नवे सरकार जाहीर केल्यानंतर २४ तासांतच राजीनामा दिला आहे. महिनाभराहून कमी काळ ते पदावर होते. फ्रान्समधील राजकीय अस्थिरता त्यामुळे अधिक गहिरी झाली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांच्यासमोर त्यामुळे नवे आव्हान उभे राहिले आहे.
फ्रान्सच्या अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचे अध्यक्षीय कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. फ्रान्क्वाँ बायरू यांच्या जागी लुकार्नू आले होते. फ्रान्समध्ये वर्षभरात चार वेळा पंतप्रधान बदलले आहेत. लुकार्नू हे वर्षातील चौथे नवनियुक्त पंतप्रधान होते. खासदारांमध्ये एकमत तयार न झाल्यामुळे पदावर राहण्यासारखी स्थिती नसल्याची प्रतिक्रियी लुकार्नू यांनी दिली.
अध्यक्ष माक्राँ यांनी गेल्या वर्षी निवडणुका जाहीर केल्यापासून या ठिकाणी अस्थिरता आहे. ‘नॅशनल असेम्ब्ली’मध्ये अतिउजवे आणि अतिडावे खासदार ३२० आहेत. तटस्थ आणि उदारमतवादी २१० खासदार आहेत. कुठल्याही पक्षाला बहुमत नाही.