मरण्यासाठी हिम्मत लागते. ती तुझ्यामध्ये आहे ? असा मेसेज प्रियकराने पाठवल्यानंतर प्रेयसीने विष पिऊन आत्महत्या केली. पूर्व बंगळुरुतील किथागानूरमध्ये मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. दीव्या के (२०) असे मृत मुलीचे नाव असून ती बी कॉमच्या पहिल्या वर्षाला होती. या घटनेनंतर दीव्याचा प्रियकर हरीश फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तो सुद्धा त्याच वस्तीत रहातो.

दिव्या आणि हरीशच्या प्रेमसंबंधांला कुटुंबियांचा विरोध असल्याने चार महिन्यांपूर्वी ते घरातून पळून गेले होते. दिव्याच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर दोघेही पुन्हा आपआपल्या घरी परतले. दिव्याला हरीश बरोबर लग्न करायचे होते. आम्ही सुद्धा या लग्नासाठी तयार झालो होतो. पण हरीशने लग्न करण्यासाठी १५ लाख रुपये मागितले तिथून समस्या सुरु झाली असे दिव्याची आई अनुराधाने सांगितले. पैसे मिळाले नाहीत तर दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन अशी हरीश धमकी देत होता असा आरोप अनुराधान यांनी केला आहे.

दिव्याने जेव्हा हरीशला लग्न करण्यासाठी मेसेज पाठवला. तेव्हा त्याने आपण दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करणार आहोत असे उत्तर दिले. तू मेलीस तरी मला फरक पडणार नाही असे हरीशने तिला सांगितले. त्यानंतर त्याने मरण्यासाठी हिम्मत लागते. ती तुझ्यामध्ये आहे ? असा मेसेज पाठवला. आधीच प्रेमात अपयश आल्याने निराश झालेल्या दिव्याने तो मेसेज वाचला व विष पिऊन आत्महत्या केली.