नोबेल पारितोषिक जाहीर होण्याचा आठवडा आता सुरू झाला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नोबेल कुणाला मिळणार यावरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. देशोदेशीचे बुकीज कामाला लागले आहेत व अनेकांनी वेगवेगळ्या नावांवर सट्टे लावले आहेत. ‘अंदाज अपना अपना’चा हा खेळ सुरू आहे.
गॉड पार्टिकलच्या शोधाला यावेळी तरी भौतिकशास्त्रातील नोबेल मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी तालिबानी अतिरेक्यांच्या हल्ल्याला पुरून उरलेली मलाला युसूफझाई या अवघ्या सोळा वर्षे वयाच्या किशोरवयीन शिक्षण हक्क कार्यकर्तीचे नाव आघाडीवर आहे, ती पाकिस्तानची आहे.
नोबेल पारितोषिक म्हणजे जगातील एक प्रतिष्ठेचे पारितोषिक समजले जाते. बौद्धिक संघर्ष व मूलभूत कोडी उलगडण्याच्या किमया, मूलभूत मानवी हक्क अशा अनेक बाबींमध्ये नैपुण्य दाखवणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. हिग्ज बोसॉनला नोबेल मिळाले की नाही, हे तुम्हाला मंगळवारीच कळेल असे स्टॉकहोम येथील कॅरोलिन्स्का संस्थेच्या वैद्यकशाखेच्या नोबेल निवड समितीचे सचिव हॅनसन यांनी सांगितले.
हिग्ज कणांच्या शिवाय अणूंचे बंध अस्तित्वात आले नसते व हे जगच अस्तित्वात आले नसते. असे असले तरी हिग्ज बोसॉनला नोबेल मिळणार नाही अशीही एक चर्चा आहे, कारण मागील वर्षी शोधण्यात आलेला नवा कण हा हिग्ज बोसॉन नव्हता तर दुसराच कण होता.
हजारो व्यक्तींच्या परिश्रमातून शोधल्या गेलेल्या गॉड पार्टिकलच्या शोधाचे श्रेय नेमक्या व्यक्तींना देण्याबाबतही वाद होऊ शकतात. डॅजन्स नेटर या स्वीडिश वृत्तपत्राच्या विज्ञान संपादिका मारिया गुंथर अॅक्सलसन यांच्या मते गॉड पार्टिकलला नोबेल मिळू शकते. फ्रँकाइस एगलर्ट या बेल्जियमच्या वैज्ञानिकाने रॉबर्ट ब्राऊट यांच्या मदतीने हिग्ज फिल्ड थिअरी म्हणजे (हिग्ज क्षेत्र सिद्धांत) मांडला होता त्यातील ब्राऊट यांचे २०११ मध्ये निधन झाले आहे. त्यामुळे एंगलर्ट यांना नोबेल मिळेल पण ते संकल्पनेला मिळेल असे त्यांनी म्हटले आहे. यातील पहिले प्रयोग इटलीच्या फॅबिओला गियानोटी व अमेरिकेच्या जोसेफ इनकँडेला यांनी केले असल्याने त्यांनाही या पुरस्कारात वाटेकरी होता येईल. यंदा शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी २५९ नामांकने आली असून हे पारितोषिक ११ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
पाकिस्तानची मलाला युसूफझाई ही किशोरवयीन शिक्षण हक्क कार्यकर्ती तालिबान्यांच्या हल्ल्यातून बचावली होती तिचे नाव या पारितोषिकासाठी घेतले जात आहे. बुकी पॅडी पॉवर यांच्या मते तिच्या नावावर २-१ असा सट्टा लागला आहे. ब्रिटनमधील बुकी लडब्रोकस यांनी हारुकी मुराकामी यांना साहित्याचे नोबेल जाहीर करून टाकले आहे. त्यांच्या मते मुराकामी यांचे साहित्य परदेशातही लोकप्रिय आहे. त्यांनी हिअर द विंड सिंग ही कादंबरी १९७९ मध्ये लिहिली तेव्हा त्यांचे नाव झाले. १९८७ मध्ये त्यांनी नॉवेजियन वूड ही कथा लिहिली, स्पुटनिक स्वीटहार्ट, काफ्का ऑन शोअर व १ क्यू ८४ या त्यांच्या पुस्तकांच्या लाखो प्रती खपल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2013 रोजी प्रकाशित
नोबेल पारितोषिकांवरही आता मोठी सट्टेबाजी
नोबेल पारितोषिक जाहीर होण्याचा आठवडा आता सुरू झाला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नोबेल कुणाला मिळणार यावरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

First published on: 08-10-2013 at 01:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: God particle in focus as nobel season kicks off