जगभरात सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर भर दिला जात आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये एआयच्या वापरामुळे नोकर कपात होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. यादरम्यान आता एक नवीन रिपोर्ट समोर आली आहे. ज्यामध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विशेष अवाहन केले आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि कोअर डेव्हलपमेंट अँड प्रोडक्ट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष ब्रायन सलुझो यांच्यासारखे अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापर वेगाने वाढवण्यास सांगत आहेत, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. कंपनीकडून खर्चात कपात करण्यासाठी नवे मार्ग शोधले जात आहेत, या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना हे अवाहन करण्यात आले आहे.

सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गुगलच्या फ्लॅगशीप प्रोडक्ट्सचे टेक्निकल फाउंडेशन तयार करणाऱ्या टीमचे प्रमुख सलुझो हे देखील या बैठकीला उपस्थित होते. यावेळी गुगल कंपनीच्या कर्मचार्यांना प्रामुख्याने कंपनीच्या ऑपरेशन्समध्ये अधिक वेगाने एआयचा सामावून घेण्यावर भर देण्यास सांगण्यात आले आहे.

सुंदर पिचाई एआयबाबतत कर्मचाऱ्यांना काय म्हणाले?

सीएनबीसीला मिळालेल्या पिचाई यांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये ते म्हणाले की, “जेव्हा तुम्ही असामान्य गुंतवणुकीच्या काळातून जात असता, तेव्हा तुम्ही त्याला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून प्रतिसाद देता, बरोबर? पण या एआयच्या काळात, मला वाटते की अधिक उत्पादकता वाढवण्यासाठी आपण या संक्रमणाचा फायदा घेऊन अधिक यश मिळवलं पाहिजे.”

“आपण यापेक्षा खूप मोठ्या गुंतवणुकीच्या काळातून जाणार आहोत आणि मला वाटते की आपल्याला संसाधनांबाबत काटकसर करावी लागेल आणि मी एक कंपनी म्हणून अधिक उत्पादक आणि कार्यक्षम होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,” असे पिचाई म्हणाले. तसेच त्यांनी आपण गुगलच्या सध्याच्या कामगिरीबाबत खूप आशावादी असल्याचेही नमूद केले.

या बैठकीत ब्रायन सलुझो यांनी देखील सॉफ्टवेअर इंजिनियर्सना मदत व्हावी म्हणून कंपनी तयार करत असलेल्या टूल्सची रूपरेषा सांगितली, यामुळे गुगलमधी सर्वांना अधिक एआय-सॅव्ही होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

आम्हाला एआय कोडिंग हे वर्कफ्लोमध्ये वेगाने आणि तात्काळ आणण्याची गरज आहे, जेणेकरून महत्त्वाच्या गरजा पूर्ण केल्या जातील आणि तुम्हाला गतीमध्ये तातडीने वाढ झाल्याचे पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले.

लोक अधिक वेगाने काम करू शकतील यासाठी गुलल एक व्यापक पोर्टफोलिओ ऑफर करते, याकडेही सालुझो यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी कंपनीच्या ‘एआय सॅव्ही गुगल’ नावाच्या इंटर्नल प्लॅटफॉर्मचा उल्लेख देखील केला, ज्यामध्ये कोर्सेस, टूलकिट्स आणि लर्निग सेशन्सचा समावेश आहे. तसेच त्यांनी इंटर्नल एआय कोडिंग टूल सायडरचा देखील उल्लेख केला. हे टूल सॉफ्टवेअर इंजिनियर्सना संपूर्ण डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये मदत करते.