एपी, न्यूयॉर्क : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्टच्या चॅट जीपीटीचा बोलबाला असतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दुसरी बलाढय़ कंपनी गूगलने बार्ड या चॅटबॉट प्रणालीची घोषणा केली आहे. सर्वसामान्य वापरकर्त्यांना ही प्रणाली उपलब्ध करून देण्यापूर्वी काही विश्वसनीय परीक्षकांकडून (टेस्टर) त्याचे मूल्यमापन केले जाईल, अशी माहिती गूगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी ब्लॉगमध्ये दिली आहे.
बार्ड ही प्रणाली सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी तसेच कुतूहल शमविण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करेल, असे पिचई यांनी सांगितले आहे. जगातील ज्ञान, सत्ता, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पिचई यांनी स्पष्ट केले आहे. वापरातील सोपेपणा हे या प्रणालीचे खास वैशिष्टय़ असेल. नासाच्या जेम्स वेब अवकाश टेलिस्कोपसारखा गुंतागुंतीचा विषय अगदी ९ वर्षांच्या लहान मुलालाही समजेल अशा भाषेत सांगितला जाईल, असा दावा पिचई यांनी केला आहे. तुम्हाला सर्चमध्ये (शोध इंजिन) लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेचे सामथ्र्य लाभलेली गुंतागुंतीची माहिती आणि एकापेक्षा अधिक दृष्टिकोन पाहायला मिळतील आणि ते समजायला सोपे आणि वापरण्यासाठी सुरक्षित असतील, असे त्यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी गूगलने लॅमडा हे भाषाविषयक प्रारूप वापरात आणले आहे. त्यावरच बार्डची उभारणी करण्यात आली आहे.
स्पर्धा वाढणार
गूगलच्या या घोषणेमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील स्पर्धा वाढणार आहे. मायक्रोसॉफ्टने काहीच महिन्यांपूर्वी चॅट जीपीटी सर्वासाठी खुले केले, त्याच्या वापरकर्त्यांची संख्या काही कोटी इतकी आहे. या चॅटबॉटची निर्मिती करणाऱ्या ओपनएआयमध्ये मायक्रोसॉफ्टने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.