भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत चुकीची आणि प्रक्षोभक माहिती पसरवणारी १,१७८ पाकिस्तानी ट्विटर अकाउंट्स बंद करण्याचे निर्देश केंद्र सरकारने ट्विटरला दिले आहेत. मात्र, ट्विटरने अद्याप यावर कार्यवाही केलेली नाही.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात २५० ट्विटर अकाउंट्स ब्लॉक करण्याचा प्रस्ताव ट्विटरकडे दिला होता. या अकाउंट्सवरुन चुकीची माहिती पसरवण्याबरोबरच ‘किसान नरसंहार’ सारखे हॅशटॅगही वापरण्यात आले होते. यासंदर्भात ट्विटरला गेल्या आठवड्यात गुरुवारी नोटीस पाठवण्यात आली होती.

गृह मंत्रालयाच्या एका अहवालानुसार, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ही मागणी केली होती की, नव्या यादीत खलिस्तान्यांप्रती सहानुभूती दाखवणारे आणि पाकिस्तानशी संबंधित अकाउंट्सचाही समावेश आहे. तसेच काही स्वयंचलित चॅटबॉट आहेत ज्यांचा वापर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान चुकीची सूचना देण्यासाठी करण्यात येत आहे.

देशात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधादरम्यान हे अकाउंट्स लोकांसाठी धोकादायक बनू शकतात, या आधारावर ते ब्लॉक करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. शेतकरी आंदोलनाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर ट्विटरकडून कारवाई न केल्याने भारतीय कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटर आयटी मंत्रालयाच्या रडारवर आहे.