एपी, तेल अवीव

‘पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांच्यासह इतर कार्यकर्त्यांबरोबर गाझा पट्टीत मदत घेऊन येणारी बोट अडवली जाईल,’ असे इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी रविवारी सांगितले.

संरक्षणमंत्री कॅट्झ यांनी सांगितले, की पॅलेस्टिनी भूभागाची नौदलाने केलेली कोंडी कुणालाही फोडू देणार नाही. अशी कोंडी करून हमास या संघटनेला शस्त्रे आयात करण्यापासून रोखले जात असल्याचे ते म्हणाले. थनबर्ग यांच्यासह १२ कार्यकर्ते मॅडलीन या बोटीवर आहेत. इस्रायलने गाझा पट्टीमध्ये केलेल्या कोंडीला वाचा फोडण्यासाठी ‘फ्रीडम फ्लोटिला’ या आघाडीची स्थापना झाली आहे. त्यासाठी मॅडलीन या बोटीतून थनबर्गसह इतर कार्यकर्ते असलेली ही बोट गेल्या रविवारी सिसिली बेटावरून निघाली. इस्रायलने गाझा पट्टीची केलेली सागरी कोंडी फोडून तेथील नागरिकांना मदत देण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे.

इस्रायलच्या गोळीबारात पाच ठार

डेर अल-बलाह: मदत वितरण केंद्रावर जाताना इस्रायलने केलेल्या गोळीबारात गाझा पट्टीत किमान पाच जणांचा मृत्यू झाला आणि अन्य काही जण जखमी झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. सैनिकांकडे येणाऱ्यांना हवेत गोळ्या झाडून इशारे देण्यात आल्याचे इस्रायली सैन्याने सांगितले.