Heart Attack एका २५ वर्षीय तरुणाचा त्याच्या लग्नातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे विधी सुरु होते, त्याने लग्नाच्या विधींमध्ये सांगितल्याप्रमाणे पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्रही घातलं. त्यानंतर काही वेळातच हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेने या तरुणाच्या कुटुंबाला, त्याच्या मित्रांना आप्त स्वकियांना सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
कुठे घडली ही घटना?
लग्नाच्या मंडपात पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यानंतर पतीचा मृत्यू झाल्याची ही घटना कर्नाटकातल्या बागलकोट या ठिकाणी असलेल्या जामखंडी मध्ये घडली आहे. लग्नाला उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण नावाच्या तरुणाने त्याच्या पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. त्यानंतर काही वेळातच त्याच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर प्रवीणच्या आणि त्याच्या पत्नीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाच्या उत्साहाने जो आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला होता त्या सगळ्या वातावरणात दुःख पसरलं
प्रवीण फक्त २५ वर्षीय तरुण होता
लग्नात ज्याचा मृत्यू झाला त्या प्रवीणचं वय फक्त २५ वर्षांचं होतं. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या कुटुंबाला या घटनेचा धक्का बसला आहे. लग्न होणार म्हणून प्रवीण खूप आनंदात होता. त्याने पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि काही वेळातच त्याच्या छातीत दुखू लागलं. ज्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली असंही प्रवीणच्या एका नातेवाईकाने सांगितलं. News 18 ने हे वृत्त दिलं आहे. लग्नाच्या मंडपात ही घटना घडल्याने अनेकांना या घटनेचा धक्का बसला.
तरुणांमध्ये हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं
दरम्यान अशा प्रकारच्या घटना वाढल्याचं दिसून येतं आहे. फेब्रुवारी महिन्यात एका लग्नात नाच करत असताना २३ वर्षीय तरुणीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातून समोर आली होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात १४ वर्षांचा एक मुलगा त्याच्या शाळेत खेळत होता तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याची घटना अलिगढ या ठिकाणी घडली होती.