Use Masks in Crowded Places : गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असं महत्त्वाचं आवाहन नीती आयोगाने आता केलं आहे. भारतात H3N2 इन्फ्लुएंझा या विषाणू संसर्गाने चिंता वाढवली आहे. देशात या इन्फ्लुएंझामुळे दोन जण दगावले आहेत. त्यानंतर आता देशभरात या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने एक बैठकही बोलावली होती. या बैठकीनंतर नीती आयोगाने सगळ्यांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात सर्दी, ताप, खोकला होणाऱ्या रूग्णांचं प्रमाण वाढलं आहे.H3N2 या व्हायरसमुळे हे होतं आहे. ICMR ने ही माहिती दिली असून काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे. तसंच ताप आला तर दुर्लक्ष करू नका असंही म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र सरकारची तातडीची बैठक

H3N2 इन्फ्लुएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्टवर आहे. नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आज महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत करोना प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, रुग्णांचं बारकाईने निरीक्षण करावं, असं सांगितलं आहे.

करोनाचे रूग्ण कमी, इन्फ्लुएंझाने डोकं काढलं वर

सध्या करोना (Coronavirus) रुग्णांमध्ये घट झाली असली तरी नव्या विषाणूनं डोकं वर काढलं आहे. हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. सर्दी आणि सततचा खोकला यावर औषधही बेजार झाली आहेत. औषधं घेतल्यानंतरही बहुतेकांना खोकल्यापासून पूर्णपणे आराम मिळताना दिसत नाहीय. हा व्हायरल संसर्ग H3N2 इन्फ्लुएंझा विषाणूमुळे होत आहे. H3N2 इन्फ्लुएंझा विषाणू H1N1 इन्फ्लुएंझा विषाणूचा उपप्रकार म्हणजेच बदललेलं स्वरुप आहे. एबीपी माझाने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

इनफ्लुएंझा म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने दिलेल्या माहितीनुसार इनफ्लुएंझा व्हायरस चार प्रकारचा असतो A, B, C, D असे चार प्रकार त्यात असतात. त्यातल्या A-B टाइपचे व्हायरस हे वातावरणातल्या बदलांमुळे पसरतात आणि आजारांचा प्रादुर्भाव होतो. इनफ्लुएंझा A हा टाइम महामारीसाठीही ओळखला जातो. या टाइप A चे दोन सबटाइम असतात एक असतो H3N2 आणि दुसरा H1N1. इनफ्लुएंझा टाइम B चे सबटाइप नसतात. टाइप सी हा फारसा गंभीर नाही. तर टाइप डी हा प्राण्यांमध्ये असतो.

ICMR ने दिल्या माहिनुसार गेल्या काही महिन्यांपासून करोनाची प्रकरणं कमी झाली आहेत. मात्र H3N2 प्रकरणं वाढत आहेत. १५ सप्टेंबर नंतर H3N2 ची प्रकरणं वाढली आहेत.

H3N2 ची लक्षणं काय आहेत?

Who ने दिलेल्या माहितीनुसार H3N2 संक्रमित रूग्णांमध्ये खोकला, कोरडा खोकला, ताप, डोकेदुखी, सांध्यांमध्ये दुखणं, थकवा येणं, गळ्यात खरखर आणि नाक वाहणं ही लक्षणं दिसतात. सुरूवातीला अनेक रूग्णांना ताप येतो त्यानंतर सर्दी, खोकला आणि अंगदुखी तसंच इतर लक्षणं दिसू लागतात असंही WHO ने म्हटलं आहे. तसंच अनेक रूग्णांमध्ये ताप आला पाच ते सात दिवसात बरा होतो पण सर्दी-खोकला बरा व्हायला दोन ते तीन आठवडे जातात.

इन्फ्लुएंझाचा कुणाला जास्त धोका?

इनफ्लुएंझाची लागण कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. मात्र या आजाराचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, म्हातारी माणसं आणि आजारांशी लढणारे रूग्ण यांना जास्त धोका असू शकतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असा सल्ला WHO ने दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: H3n2 influenza niti aayog advises to use masks in crowded places for safty scj