Attack on Israel: इस्रायलच्या भूमीवर आज सकाळीच गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला चढवला. मिळालेल्या माहितीनुसार, या रॉकेट्सची संख्या तब्बल ५ हजाराच्या घरात आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये आत्तापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. यासंदर्भात इस्रायल सरकारकडून देशातील नागरिकांसाठी सतर्कतेच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. एकीकडे इस्रायलनं हमासविरोधात युद्धाची घोषणा केली असताना दुसरीकडे इस्रायलमधील भारतीय दूतावासाने तेथील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

…आणि इस्रायलनं युद्धाची घोषणा केली!

शनिवारी सकाळीच इस्रायलवर अचानक मोठ्या संख्येनं रॉकेट्स येऊन कोसळले. हमासनं गाझा पट्टीतून हा रॉकेट हल्ला केल्याचं स्पष्ट होताच इस्रायलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी यासंदर्भात आपल्या नागरिकांना माहिती दिली आहे. त्यापाठोपाठ इस्रायलनं गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हवाई हल्ला सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर गाझा पट्टीत रेड सायरन (अतीधोक्याचा इशारा) देण्यात आल्याचं समोर आलं आहे.

भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचना!

दरम्यान, इस्रायलमध्ये हमास या दहशतवादी संघटनेकडून रॉकेट हल्ले होत असताना भारताच्या इस्रायलमधील दूतावासानं तेथील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतीय दूतावासानं यासंदर्भात एक्सवर (ट्विटर) पोस्ट केली असून त्यात इस्रायलमधील भारतीयांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

“इस्रायलमधील सध्याची परिस्थिती पाहाता तेथील भारतीय नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सतर्क राहावं. स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सुरक्षा नियमावलीचं भारतीयांनी काटेकोरपणे पालन करावं. भारतीयांनी काळजी घ्यावी. आवश्यकता नसल्यास बाहेर पडू नये. आपल्या व कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित आश्रयाच्या जवळच राहावं”, असं या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

तसेच, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा किंवा संकटाचा प्रसंग उद्भवल्यास दूतावासाशी संपर्क साधण्याचं आवाहन भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी इस्रायलमधील भारतीय नागरिकांना केलं आहे. यासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे.

गाझा पट्टीतून दहशतवाद्यांची घुसखोरी

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार, गाझा पट्टीतून मोठ्या संख्येनं दहशतवादी इस्रायलच्या भूमीत शिरले असून त्यामुळे इस्रायलच्या रस्त्यारस्त्यांवर, विशेषत: गाझा पट्टीजवळच्या भागात इस्रायली लष्कराचे सैनिक दिसत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी “आपण युद्धा आहोत. आपले शत्रू या कृत्याची अशी किंमत चुकवतील ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल”, अशा शब्दांत इस्रायली जनतेला विश्वास दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamas rocket attack on israel from gaza strip advisory for indians pmw